दिवाळीच्या दिवसांतली शांतता जीवघेणी
By | Published: December 2, 2020 04:06 AM2020-12-02T04:06:43+5:302020-12-02T04:06:43+5:30
अनलॉक प्रक्रियेत भारतातील बरीच पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली केली आहेत. महाराष्ट्रातही कोकण किनारे, रायगड किल्ला, एलिफंटा लेणी खुली झाली आहे. ...
अनलॉक प्रक्रियेत भारतातील बरीच पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली केली आहेत. महाराष्ट्रातही कोकण किनारे, रायगड किल्ला, एलिफंटा लेणी खुली झाली आहे. मात्र, जगप्रसिद्ध वेरूळ- अजिंठा लेणी अद्यापही कडी- कुलूपात बंद असल्याने यावर अवलंबून असणाऱ्या पर्यटन व्यावसायिकांवरचे आर्थिक संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे.
ऑक्टोबर ते मार्च हा औरंगाबादच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ असतो. या काळात विमानापासून ते पर्यटनस्थळांवर असणारे फेरीवाले यांची एकत्रित आर्थिक उलाढाल ५०० कोटींपर्यंत होते. विमान तिकीट, तिकीट बुकींग कार्यालये, टूर ऑपरेटर, टॅक्सी व्यावसायिक, गाईड, हॉटेल, रेस्टॉरंट, फेरीवाले, हस्तकला व्यावसायिक, दुकानदार, पर्यटनस्थळांच्या मार्गावर बसणारे फळ-फूलविकेते या सर्वांचाच उदरनिर्वाह पर्यटनावर अवलंबून असल्याने सर्वांवरच बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
चौकट
५० कोटींची उलाढाल ठप्प
- दिवाळीनंतर केवळ १५ दिवसांच्या सुटीच्या काळात औरंगाबादच्या पर्यटनक्षेत्रातील आर्थिक उलाढाल ५० कोटींच्या घरात होत होती.
- अजिंठा, वेरूळ, मकबरा या ठिकाणी सक्रिय असणाऱ्या गाईडची संख्या ५० आहे. दिवाळीच्या काळात या प्रत्येकाचा व्यवसाय अंदाजे ५० हजार ते १ लाख या दरम्यान व्हायचा. तो आता पूर्णपणे शून्यावर आला आहे.
- हिमरू व्यावसायिकांची खुलताबाद, वेरूळ, अजिंठा याठिकाणी असणारी एकत्रित दुकानांची संख्या जवळपास २५ आहे. दिवाळीच्या पंधरा दिवसांत एका दुकानाचा व्यवसाय दीड ते दोन लाख रुपये एवढा होत होता.
- पर्यटकांना टॅक्सी सुविधा देणाऱ्या व्यावसायिकांची एका दिवसाची उलाढाल ५० हजारांच्या आसपास असायची आता मात्र आठ दिवसांतून ५ हजार रुपयांचीही उलाढाल होत नाही.