छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत वादानंतर शांतता; दगडफेक, पोलिसांच्या गाड्याही जाळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 08:52 AM2023-03-30T08:52:17+5:302023-03-30T08:54:04+5:30
आझाद चौक परिसरात जमाव मोठ्या संख्येने जमला होता. पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तातडीने परिस्थीती हाताळली.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील किराडपुरा परिसरात असलेल्या राम मंदिराच्या परिसरात मध्यरात्री काही समाजकंटकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या गोंधळाचे पर्यावसान दगडफेकीत झाले. यावेळी पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्याची घटना घडली आहे.
आझाद चौक परिसरात जमाव मोठ्या संख्येने जमला होता. पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तातडीने परिस्थीती हाताळली. मोठा फौजफाटा तैनात करत पहाटे पाच वाजेपर्यंत परिस्थिती आटोक्यात आणली. यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तर हवेतही गोळीबार करण्यात आला. जमावाला पांगविण्यासाठी ही पाऊले उचलल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
जमावाला शांत करण्यासाठी खासदार इम्तियाज जलील, शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे प्रयत्न करत होते. सध्या छत्रपती संभाजीनगर शहरात तणावपूर्ण शांतता असून सध्या सर्वजण रामनवमी उत्सवात सहभागी होण्याची तयारी करत आहेत. लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावानंतर शांतता. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचे रामनवमी शांततेत पार पाडण्याचे आवाहन. #ChatrapathiSambhajinagar#Maharashtra#Policehttps://t.co/CbvSFUB0GJpic.twitter.com/A45PwmLA7b
— Lokmat (@lokmat) March 30, 2023
आज रामनवमी आहे. हिंदू धर्मात आनंदचा सण आहे. शहराचे वातावरण शांत ठेवण्यासाठी सर्वांनी भूमिका पार पाडली पाहिजे, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी केले आहे.