शिखर कन्या मनीषाची शानदार कामगिरी; दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च शिखरावर फडकावला तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 03:49 PM2020-01-28T15:49:02+5:302020-01-28T15:52:05+5:30
चढाईसाठी अत्यंत कठीण असलेले हे शिखर आन्देस पर्वतरांगेत अर्जेंटिनाच्या मेन्दोसा प्रांतात स्थित आहे.
औरंगाबाद : मराठवाड्याची शिखर कन्या प्रा. मनीषा वाघमारे हिने रविवारी दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च उंचीवर असणारे अकॉन्कागउआ हे शिखर यशस्वीपणे सर केले. तिने हे शिखर पोलिश ग्लेशियरच्या मार्गाने सर केले.
अकॉन्नागउआ शिखराची उंची ६ हजार ९६0 मीटर (२२ हजार ८३७ फूट) इतकी आहे. चढाईसाठी अत्यंत कठीण असलेले हे शिखर आन्देस पर्वतरांगेत अर्जेंटिनाच्या मेन्दोसा प्रांतात स्थित आहे. वाढते जागतिक तापमान बघता या मोहिमेदरम्यान मनीषाने ‘स्टॉप ग्लोबल वार्मिंग’चा संदेश हाती घेतला होता. २0१८ मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित मनीषाने या मोहिमेला ५ जानेवारीपासून सुरुवात केली होती. ४ फेब्रुवारी रोजी मनीषाचे भारतात आगमन होणार आहे. अकॉन्कागउआ शिखरासाठी मनीषाने ६ महिन्यापांसून कसून सराव केला होता. मनीषा वाघमारे इं.भा. पाठक महिला महाविद्यालयात क्रीडा संचालिका म्हणून कार्यरत आहे.
जगातील सात खंडांतील सर्वोच्च शिखर पादाक्रांत करण्याचे स्वप्न मनीषाचे आहे. याआधी तिने जगातील सर्वोच्च उंचीवर आशिया खंडातील २९ हजार ३५ फूट असणारे एव्हरेस्ट शिखर २१ मे २0१८ मध्ये सर केले होते, तसेच आफ्रिका खंडातील १९ हजार ३४0 फूट उंचीवरील किलीमांजरो शिखर २0१५ मध्ये नोव्हेंबर महिन्यात सर केले होते, तर युरोप खंडातील १८ हजार ५१0 फूट उंचीवरील एल्ब्रूस शिखर ३१ जुलै २0१५ मध्ये आणि आॅस्ट्रेलिया खंडातील कोसिआस्को व आॅसी १0 शिखर हे ३ नोव्हेंबर २0१४ मध्ये सर केले होते. या मोहिमेसाठी तिला इंडियन कॅडेट फोर्सचे विनोद नरवडे, एमजीएमचे अध्यक्ष अंकुशराव कदम, तंदुरुस्ती प्रशिक्षक शशिकांतसिंग आदींचे मार्गदर्शन लाभले.