पर्यटन राजधानी फुलली, दिवसभरात ५० हजार पर्यटकांनी न्याहाळले ‘दख्खन का ताज’चे सौंदर्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 12:47 PM2022-12-26T12:47:08+5:302022-12-26T12:47:33+5:30
गर्दीचा विक्रम, दिवसभरात ‘दख्खन का ताज’ ५० हजार, दौलताबाद किल्ला ३० हजार पर्यटकांनी न्याहाळला
औरंगाबाद : नाताळच्या सुटीचे औचित्य साधून रविवारी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी एकच गर्दी केली. पर्यटक आणि सहलीवर आलेल्या शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या गर्दीने प्रत्येक स्थळ गजबजून गेले होते. एकट्या ‘दख्खन का ताज’ म्हणजे बीबी का मकबरा येथे दिवसभरात ५० हजारांवर, तर दौलताबाद किल्ला येथे ३० हजारांवर पर्यटकांनी भेट देत ऐतिहासिक स्थळांचे सौंदर्य न्याहाळले.
बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला येथे पर्यटकांच्या गर्दीने अक्षरशः रांगा लागल्या होत्या. शहरवासीयांनी नाताळनिमित्त सुटीची संधी साधत रविवारी घराबाहेर पडत शहर आणि जिल्ह्यातील पर्यटनस्थळी धाव घेतली. शहरातील बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, दौलताबाद किल्ला, वेरूळ लेणी येथे पर्यटकांची तोबा गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. दिवसभर पर्यटकांची गर्दी सुरूच होती. बीबी का मकबरा येथे पर्यटकांना वाहन उभे करण्यासाठीही जागा शोधावी लागत होती. एरव्ही सुटीच्या दिवशी मकबऱ्याला पर्यटकांची गर्दी असते; परंतु रविवारी इतर दिवसांपेक्षा अधिक गर्दी असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दौलताबाद किल्ल्यावर रांगा
दौलताबाद किल्ला चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या पर्यटकांची लांब रांग लागली होती. बीबी का मकबरा येथे दिवसभरात जवळपास ५० हजारांवर आणि दौलताबाद किल्ला येथे सुमारे ३० हजार पर्यटकांनी भेट दिली, अशी माहिती भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे संरक्षण सहायक संजय रोहणकर यांनी दिली.