पीकविमा केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:53 AM2017-07-23T00:53:27+5:302017-07-23T00:54:00+5:30
जालना : खरीप पीकविमा भरण्यासाठी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या कॉमन सर्र्व्हिस सेंटरवर शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे.
बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : खरीप पीकविमा भरण्यासाठी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या कॉमन सर्र्व्हिस सेंटरवर शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. मात्र, ग्रामीण भागातील केंद्रांवर पीकविमा भरण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांकडून सर्रास पैसे उकळले जात आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ८४ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे. मात्र समाधानकारक पावसाअभावी सर्वच पिकांची स्थिती नाजूक आहे. काही तालुक्यांत शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. पिके वाया गेल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ३१ जुलैपर्यंत पीकविमा काढून घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता जिल्ह्यात प्रथमच तालुका व ग्रामपंचायत स्तरावर ७१५ ठिकाणी कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या सर्व्हिस सेंटरवर शेतकऱ्यांना मोफत आॅनलाईन पीकविमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे असले तरी काही सर्व्हिस सेंटरवर फॉर्मसाठी दहा व विमा अर्ज आॅनलाईन करण्यासाठी शंभर रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या प्रशिक्षण शिबिरात एकाही पीकविमा केंद्र चालकाने शेतकऱ्यांकडून विमा भरण्यासाठी पैसे घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, केंद्र चालकांनी याकडे कानाडोळा केल्याचे ग्रामीण भागात दिसत आहे. सातबारा, एकूण जमिनीचा दाखला काढण्यासह पीकपेरा नोंदी घेण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत आहे.