वर्दळीच्या रस्त्यावर पादचारी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे गंठन दुचाकीस्वारांनी हिसकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 10:53 PM2019-01-06T22:53:50+5:302019-01-06T22:54:03+5:30
शहरातील वर्दळीच्या फाजलपुरा ते एस.टी. कॉलनी रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले.
औरंगाबाद : शहरातील वर्दळीच्या फाजलपुरा ते एस.टी. कॉलनी रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
काचीवाडा येथील रहिवासी योगिता सुरेश बागले (२४) या रविवारी सकाळी काचीवाडी येथून फाजलपुरा परिसरातील एस.टी. कॉलनीतील शिकवणी सेंटरमध्ये पुतण्याला सोडण्यासाठी गेल्या होत्या. पुतण्याला सोडून त्या पायी घरी परत जात होत्या. फाजलपुरा ते एस.टी. कॉलनी रस्त्यावरील स्वस्त धान्य दुकानासमोर त्या असताना समोरून आलेल्या काळ्या रंगाच्या दुचाकीस्वार दोन चोरट्यांनी त्यांच्याजवळ येताच दुचाकीचा वेग कमी केला. दुचाकीवर मागे बसलेल्या एकाने अचानक त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून घेतले आणि ते दुचाकीने सुसाट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघून गेले. योगिता यांनी आरडाओरड करीत त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. विशेष म्हणजे स्वस्त धान्य दुकानासमोर पंधरा ते वीस ग्राहक धान्य खरेदीसाठी उभे होते. ते ग्राहक धान्य घेण्यात व्यस्त असल्याने त्यांचे चोरट्यांकडे लक्ष नव्हते. यामुळे योगिता यांच्या मदतीसाठी कोणीही धावून आले नाही. या घटनेनंतर योगिता यांनी लगेच सिटीचौक पोलिसांना घटनेची माहिती कळविली. योगिता आणि त्यांचे पती सुरेश बागले यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली.
पोलिसांकडून शोध सुरू
सकाळी अकरा वाजता वर्दळीच्या एस.टी. कॉलनी रस्त्यावर पादचारी महिलेचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेल्याचे कळताच पोलीस निरीक्षक दादासाहेब सिनगारे, उपनिरीक्षक राजेंद्र बांगर आणि कर्मचाºयांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. घटनास्थळ परिसर मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी तपासणी सुरू केली.
मास्क घालून लुटले मिनी गंठण
पकडले जाऊ नये, तसेच सीसीटीव्ही कॅमेºयात आपला चेहरा दिसू नये, याकरिता चोरट्यांनी चेहºयाला मास्क लावलेला होता. शिवाय त्यांच्या मोटारसायकलच्या नंबर प्लेटवर मागील आणि समोरील बाजूला त्यांनी नंबर टाक लेला नव्हता, असे योगिता यांनी सांगितले.