पादचाऱ्यांनो, खास तुमच्यासाठी शहरातील ३ रस्ते मोकळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 03:21 PM2020-10-26T15:21:23+5:302020-10-26T15:21:49+5:30
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्पर्धेत औरंगाबाद महानगरपालिकेचा सहभाग
औरंगाबाद : नागरिकांना सहजपणे व सुरक्षित पायी चालता यावे, या हेतूने औरंगाबाद शहर ‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ या राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेत सहभागी होत आहे. शहरातील कॅनॉट सर्कल, क्रांती चौक ते उस्मानपुरा सर्कल आणि पैठण गेट ते गुलमंडी या तीन रस्त्यांची निवड या पायलट प्रोजेक्टसाठी करण्यात आली आहे.
केंद्रीय शहरी विकास खात्यांतर्गत दि इंडिया स्मार्ट सिटी मिशन यांनी राष्ट्रीय स्तरावर ‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. या योजनेचा उद्देश शहरातील रस्त्यांच्या आर्थिकदृष्ट्या विकास, नागरिकांची सुरक्षा आणि लहान मुलां-मुलींसाठी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करून कोरोना संसर्गातून ग्रीन रिकव्हरी करणे असा आहे. औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएस्सीडीसीएल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी एएस्सीडीसीएल आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून कॅनॉट सर्कल, क्रांती चौक ते उस्मानपुरा सर्कल आणि पैठण गेट ते गुलमंडी या रस्त्यांची निवड पायलट प्रोजेक्ट म्हणून केली आहे. सहायक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर यांच्या नेतृत्वाखाली एएस्सीडीसीएलचे एक पथक, अर्बन रिसर्च कॉलेब्रेटिव्हचे श्रीनिवास देशमुख आणि पल्लवी देवरे मागील एक महिन्यापासून या प्रकल्पासाठी विविध मापदंडाआधारे रस्त्यांचे सर्वेक्षण करीत होते. पायलट प्रोजेक्टची अंमलबजावणी करताना पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षित जागांची निर्मिती, सौंदर्यीकरण आणि आर्थिक प्रगतीच्या विचार करण्यात येणार आहे.
नागरिकांच्या मदतीने राबविलेला प्रकल्प
हा प्रकल्प नागरिकांसाठी असून, नागरिकांच्या मदतीने अमलात येणार आहे. शहरातील रस्त्यांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सिटीझनस ग्रुप, वास्तुविशारद, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांनी या प्रकल्पात औरंगाबाद महानगरपालिका आणि एएस्सीडीसीएल यांना सहकार्य करावे. नोव्हेंबर महिन्यात काही स्ट्रीट इव्हेंट्सचे नियोजन करण्यात येणार असून, सदरील मोहिमेत नागरिकांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे, तसेच या मोहिमेबाबत माहितीही मिळणार आहे.
- आस्तिककुमार पाण्डेय, प्रशासक, मनपा.