पादचारी महिलेच्या गळ्यातील दोन सोनसाखळी लांबविल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 01:55 PM2017-10-01T13:55:42+5:302017-10-01T13:56:11+5:30
मावशीला भेटण्यासाठी बहिणीसह जणा-या एका महिलेच्या गळ्यातील चार तोळ्याच्या दोन सोनसाखळ्या दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्या. ही घटना शनिवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास बीड बायपास परिसरातील छत्रपतीनगरात घडली.
औरंगाबाद, दि. 1: मावशीला भेटण्यासाठी बहिणीसह जणा-या एका महिलेच्या गळ्यातील चार तोळ्याच्या दोन सोनसाखळ्या दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्या. ही घटना शनिवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास बीड बायपास परिसरातील छत्रपतीनगरात घडली.
पोलिसांनी सांगितले की, सातारा परिसरातील दक्षिण विहार येथील रहिवासी सीमा देशमुख (वय ५४) या शनिवारी रात्री त्यांच्या मावसबहिणीसह परिसरातच राहणा-या मावशीच्या घरी पायी जात होत्या. एका हॉटेलच्या मागील गल्लीतून त्या जात असताना एक दुचाकीस्वार त्यांच्या समोरून पुढे गेला.यानंतर तो पुन्हा वळून परत आला. यावेळी या चोरट्याने सीमा यांच्या गळ्यातील मंगळसुत्र आणि नेकलेस असा सुमारे साडेचार तोळ्याचे दागिने हिसकावले आणि तो दुचाकीने सुसाट निघून गेला.
यावेळी सीमा आणि त्यांच्या बहिणीने आरडाओरड केली. मात्र, आसपास कोणीही नसल्याने चोरट्याला कोणीही अडवले नाही. शिवाय त्याने हेल्मेट परिधान केलेले होते. यानंतर देशमुख यांनी घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना आणि पोलिसांना दिली. सातारा ठाण्याचे निरीक्षक भारत काकडे आणि चार्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लागलीच त्या परिसरात नाकाबंदी केली. परंतु, चोरटा अजूनही हाती लागला नाही. याप्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
सीसीटिव्हीची तपासणी
चोरट्याच्या वर्णन आणि दुचाकीच्या आधारे परिसरातील सीसीटिव्हीमध्ये चोरटा कैद झाला असावा,असा संशय पोलिसांना आहे. यामुळे रात्री उशीरापर्यंत आणि रविवारीही पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्हीच्या फुटेजची पहाणी केली.