मुलांचा आहार,‘स्क्रीन टाईम’साठी बालरोग तज्ज्ञ सरसावले

By राम शिनगारे | Published: July 4, 2024 06:11 PM2024-07-04T18:11:14+5:302024-07-04T18:11:46+5:30

महापालिकेच्या दहा शाळांमध्ये राबविणार उपक्रम : भारतीय बालरोग अकादमीचा शालेय शिक्षण विभागासोबत करार

pediatrician focused on children's diet, 'screen time' | मुलांचा आहार,‘स्क्रीन टाईम’साठी बालरोग तज्ज्ञ सरसावले

मुलांचा आहार,‘स्क्रीन टाईम’साठी बालरोग तज्ज्ञ सरसावले

छत्रपती संभाजीनगर : सध्या प्रत्येक घरातील पालक मुलांच्या स्क्रीन टाईम, आहारातील जंक फूडच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. या सवयी बदलण्यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे भारतील बालरोग अकादमीने शालेय शिक्षण विभागासोबत चौथी, पाचवीतील मुलांसाठी ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ हा उपक्रम राबविण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार राज्यातील महापालिका क्षेत्रातील प्रत्येकी दहा शाळांमध्ये हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यास सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजीनगरातील मनपाच्या दहा शाळांची निवड उपक्रमासाठी केल्याची माहिती शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी दिली.

भारतीय बालरोग अकादमीने ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ हा उपक्रम राज्यातील शाळांमध्ये राबविण्यासाठी १४ नोव्हेंबर २०२२ रोजी सामंजस्य करार केला होता. या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ३० मे रोजी ऑनलाइन बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये राज्यातील आठ विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या हद्दीतील प्रत्येकी दहा मनपा शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या दहा शाळांची निवड या उपक्रमासाठी केली आहे. उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षण उपनिरीक्षक डॉ. सतीश सातव यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केल्याचेही उपसंचालक साबळे यांनी सांगितले. या उपक्रमात बालकाचा आहार, मानसिक व भावनिक आरोग्य, स्क्रीन टाईमसह वेगवेगळ्या सवयीच्या अनुषंगाने बालरोगतज्ज्ञ मार्गदर्शन करतील. यावेळी विद्यार्थ्यांसोबत आंतरक्रियाही घडवून आणली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘या’ शाळांची केली निवड
महापालिकेच्या दहा शाळांमध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा बेगमपुरा, किराडपुरा नं. १ (उर्दू), सिडको एन-७, नारेगाव, मुकुंदवाडी, प्रियदर्शनी इंदिरानगर, बन्सीलालनगर (मराठी व उर्दू), इंदिरानगर बायजीपुरा, हर्सूलगाव (म) आणि बनेवाडी या मनपाच्या शाळांचा समावेश आहे.

ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञांचा सहभाग
शहरातील महापालिकेच्या दहा शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे, डॉ. सुहास रोटे, डॉ. मंजूषा शेरकर आदी बालरोगतज्ज्ञ प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना १० व ११ जुलै रोजी मार्गदर्शन करणार आहेत. १० जुलै रोजी इंदिरानगर येथील प्रियदर्शनी शाळेत या उपक्रमाला सुरुवात होणार असल्याचे समन्वयक डॉ. सतीश सातव यांनी सांगितले.

Web Title: pediatrician focused on children's diet, 'screen time'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.