रेल्वेचे प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:04 AM2021-09-19T04:04:27+5:302021-09-19T04:04:27+5:30
--- औरंगाबाद : राज्याकडे रेल्वेसंबंधीचे प्रलंबित असलेले प्रश्न घेऊन मी मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. बीड- परळी रेल्वे मार्गाला केंद्राने ...
---
औरंगाबाद : राज्याकडे रेल्वेसंबंधीचे प्रलंबित असलेले प्रश्न घेऊन मी मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. बीड- परळी रेल्वे मार्गाला केंद्राने पैसे दिले. आतापर्यंत ३० किलोमीटरचे काम पूर्ण झाले. दुसऱ्या टप्प्यातील काम सुरु आहे. राज्याच्या हिस्स्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत, तरीही काम थांबलेले नाही, असे केेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.
टीम ऑफ असोसिएशनच्या वतीने शनिवारी केेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, सीएमआयएचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू, औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रीतेश चॅटर्जी, सीआयआयचे अध्यक्ष रमण अजगावकर, मासिआचे उपाध्यक्ष किरण जगताप, लघु उद्योगभारतीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र वैद्य, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. उद्योजक अनिल सावे, राम भोगले यांच्यासह व्यापार, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. शिवप्रसाद जाजू यांनी प्रास्ताविक केले. सतीश लोणीकर यांनी सूत्रसंचालन केले तर नितीन गुप्ता यांनी आभार मानले.
यावेळी रेल्वे राज्यमंत्री दानवे म्हणाले, आणली खडी, टाकले डांबर आणि केले भूमिपूजन, असे रेल्वे खाते नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प हाती घेतले. त्यात समृद्धी महामार्गासोबत मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा आठवा प्रकल्प मी घुसवू शकतो. जालना-खामगाव, सोलापूर-जळगाव अशा छोट्या प्रकल्पांवरुन माझा परफॉर्मन्स मोजू नका. शरद पवार यांनी पुणे-औरंगाबाद जलद रेल्वे विषयी विचारणा केली. राज्य सरकारने हिस्सा दिल्यास पुणे-नगर, नगर-औरंगाबाद रेल्वेलाईन पूर्ण होईल. पुण्यानंतर औरंगाबादेत मालवाहतुकीला स्कोप आहे. रेल्वेसोबत काम करण्याच्या नव्या योजना घेऊन या. प्रकल्प सूचवा.
चौकट......
उद्योजकांच्या अपेक्षा
- आंतरराष्ट्रीय विमानतळ, ड्रायपोर्ट, औरंगाबाद-वाळूज रस्त्यावरील ओव्हर ब्रिज ही सुरु झालेली कामे जलदगतीने पूर्ण करावीत.
- डिफेन्सप्रमाणे रेल्वे क्लस्टर करावे. त्यासाठी व्हेंडर कोड ५ वर्षांचा हवा.
- डीएमआयसी ते जेएनपीटीकडे जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग गरजेचा.
- डीएमआयसी ते ड्रायपोर्ट रस्ता ६ पदरी हवा.
- लातूर कोच फॅक्टरीमध्ये औरंगाबादच्या उद्योजकांना संधी मिळावी.