साडेपाच हजार वारसदार मुलांना मिळत आहे निवृत्तीवेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 04:41 PM2019-07-17T16:41:08+5:302019-07-17T16:45:05+5:30
पेन्शनर्सच्या पश्चात पत्नी व दोन मुलांना पेन्शन मिळते.
औरंगाबाद : सेवानिवृत्त वडील व आईच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात १८ वर्षांच्या आतील मुलांना (वारसांना) आई-वडिलांचे निवृत्तीवेतन मिळते. विभागात अशा ५ हजार ६५६ वारसदारांना सध्या पेन्शन मिळत आहे.
भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे क्षेत्रीय आयुक्त एम.एच. वारसी यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत सांगितले की, आजघडीला विभागात ६३ हजारांपेक्षा अधिकांना निवृत्तीवेतन मिळत आहे. त्यात वयाची ५८ वर्षे पूर्ण केलेले सुपर अनिवेशन पेन्शनर्स २३ हजार २९० आहेत. अर्ली पेन्शनधारक १८ हजार ४८५ आहेत. पेन्शनर्सचे निधन झाल्यास त्यांच्या पश्चात पत्नीला पेन्शन मिळते, अशांची संख्या १३ हजार ६०३ आहे, तसेच पेन्शनर्सच्या पश्चात पत्नी व दोन मुलांना पेन्शन मिळते. एकूण पेन्शनच्या ७५ टक्के रक्कम पत्नीला व उर्वरित रकमेतील निम्मी-निम्मी रक्कम त्या १८ वर्षांखालील दोन मुलांना मिळते. अशा ५ हजार ६५६ वारसदार मुलांना पेन्शनची रक्कम मिळत आहे. सेवानिवृत्त वडील व आईच्या पश्चात पेन्शनचा लाभ १२१ मुलांना मिळतो आहे. नॉमिनी पेन्शनधारकांची संख्या ७४ आहे.
मागील ३ वर्षांदरम्यान ८ हजार सेवानिवृत्तांनी हयात प्रमाणपत्र दाखल केले नाही. त्यांचे निवृत्तीवेतन रोखले आहे. यातील अनेकांना त्यांच्या सेवाकाळातील पत्त्यावर पत्र पाठविले आहे. त्यातील १,४०० जणांनी नंतर हयात प्रमाणपत्र दाखल केले व त्यांची पेन्शन सुरू झाली.
विद्यापीठातील कंत्राटी कामगारांची चौकशी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात खाजगी कंत्राटी कामगार काम करीत आहेत. मात्र, त्यांचा भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करण्यात येत नसल्याचे उजेडात आले आहे. यासंदर्भात याआधी विद्यापीठ प्रशासनाला नोटीस पाठविण्यात आली. पीएफ कार्यालयाने चौकशी सुरू केली आहे. नवे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी आज पदभार स्वीकारला आहे. त्यांना याविषयी माहिती देऊन पुढील चौकशी सुरू राहणार आहे.