संस्थाचालकासह शिक्षकांची ७० लाखांची फसवणूक करणारा शिपाई अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 07:48 PM2018-10-26T19:48:28+5:302018-10-26T19:50:24+5:30
आमिष दाखवून संस्थाचालकांसह २२ शिक्षकांची तब्बल ७० लाखांची फसवणूक करणाऱ्या शिपायाला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली.
औरंगाबाद : शाळेच्या वाढीव तुकड्यांसह शिक्षकांना संच मान्यता मिळवून देतो, असे आमिष दाखवून संस्थाचालकांसह २२ शिक्षकांची तब्बल ७० लाखांची फसवणूक करणाऱ्या शिपायाला पुंडलिकनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. सुनील गोपाल चौधरी (४०, रा. वाळूज महानगर, मूळ रा. धरणगाव, जि. जळगाव) असे अटकेतील शिपायाचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक एल. ए. सिनगारे म्हणाले की, तक्रारदार मेधा चंद्रकांत रेखे या त्रिमूर्ती शिक्षणसंस्थेच्या संचालक आहेत. त्यांच्या संस्थेची बजाजनगर येथे त्रिमूर्ती हायस्कूल ही शाळा आहे. या शाळेतील वाढीव तुकड्यांना मान्यता आणि तेथे कार्यरत शिक्षकांची जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाकडून संच मान्यता शिक्षण विभागाकडून आणून देतो, शाळेतील २२ कर्मचाऱ्यांच्या संच मान्यता करणे असल्याने वैयक्तिक संच मान्यतेसाठी त्याने साडेतीन ते चार लाख रुपये खर्च सांगितला. त्याच्यावर विश्वास ठेवून सर्व शिक्षकांनी पैसे गोळा करून संस्थाचालक महिलेमार्फत सुनीलला तीन टप्प्यांत ७० लाख रुपये दिले.
ही रक्कम हातात पडल्यानंतर तो तक्रारदारांना भेटतच नव्हता. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच चौधरी पसार झाला होता. तो न्यायालयात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिनगारे यांना मिळाली. त्यांनी लगेच न्यायालयातील पैरवी अधिकारी, तसेच कर्मचारी सचिन सांगळे आणि इतरांनी त्यास अटक केली.