औरंगाबादमध्ये राग व संतापाने एकवटली जनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:52 AM2018-04-02T00:52:48+5:302018-04-02T11:24:02+5:30
संकेत कुलकर्णीच्या भरदिवसा झालेल्या निर्घृण हत्येने कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडविल्या असतानाच नागरिकही हादरले होते. मनामध्ये दाटलेला राग व संताप नागरिकांनी रविवारी उत्स्फूर्त शोकसभा बोलावून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून दाखवून दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : संकेत कुलकर्णीच्या भरदिवसा झालेल्या निर्घृण हत्येने कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडविल्या असतानाच नागरिकही हादरले होते. मनामध्ये दाटलेला राग व संताप नागरिकांनी रविवारी उत्स्फूर्त शोकसभा बोलावून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून दाखवून दिला. आरोपींना अटक न झाल्यास पुढील सोमवारी पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याचा अल्टिमेटमही देण्यात आला. यावेळी संकेतचे वडील संजय कुलकर्णी यांच्यासह नातेवाईक व बाहेरगावांहून आप्तेष्ट आले होते.
संकेतच्या फरार मारेकऱ्याला त्वरित अटक करा, त्यांच्यावर जलदगती कोर्र्टात खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी एकमुखी मागणी यावेळी नागरिकांनी केली. या शोकसभेचे आयोजन कोणत्याही पक्ष, संघटनेच्या पाठिंब्याशिवाय सामान्य नागरिकांनीच केले होते. सामान्यांच्या हाकेला प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने नागरिक या शोकसभेला हजर झाले. ज्याठिकाणी ही क्रूर हत्या झाली, त्याच सिडको एन-२, ठाकरेनगर चौकात रविवारी सायंकाळी ४ वाजता ही शोकसभा झाली. यावेळी विविध पक्ष, संघटना तसेच जाती-धर्मांचे नागरिक शोकसभेत सहभागी झाले होते. दोन मिनिटे शांत उभे राहून संकेतला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आम्ही प्रयत्न केले; परंतु...
घटनेच्या प्रत्यक्षदर्शी मीरा पाटील, जयश्री शिवपुरे यांनी यावेळी कथन केलेल्या बाबींनी अनेकांचे डोळे पाणावले होते. हा खून कसा झाला याचे वर्णन करताना त्यांनी घटनास्थळावरचे चित्रच उभे केले. त्या म्हणाल्या मारेकºयांना दगडाचा मारा करून अटकाव करण्याचाही प्रयत्न केला; परंतु बचाव करणारेदेखील जीवाच्या भीतीने सैरभैर पळत होते. मारेकरी अखेर त्याच्या प्रयत्नात यशस्वी झाला होता. आम्ही हतबल होऊन संकेतला वाचविण्यात अपयशी ठरलो, अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. रेणुका घुले म्हणाल्या की, माझा नातेवाईक मुलगाही या प्रकारात जखमी असून, तो अद्याप त्यातून सावरला नाही. अंगावर गाडी घालून ठार मारण्याची ही घटना अत्यंत निंदणीय आहे. आरोपीला फाशीच व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
अजूनही कुणाकडे पुरावे असतील, तर त्यांंनी पुढे यावे
हा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा आहे. एक संकेत नव्हे, तर अनेक अनर्थकारक घटना होण्यापासून वाचविण्यासाठी पालक व प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना घटनेची माहिती, व्हिडिओ, फोटो द्यावेत, अशी भूमिका माजी महापौर भगवान घडामोडे, संजय जोशी, संजय केणेकर, सविता कुलकर्णी, मिलिंद दामोदरे, दामूअण्णा शिंदे, माधुरी अदवंत, रंजना कुलकर्णी, राजू वैद्य यांनी मनोगतातून मांडली.
संकेत कुलकर्णी खुनातील फरार आरोपींवर खुनासह १२० ब प्रमाणे गुन्हा लावला आहे. ते फरार असल्याने त्यांच्या पालकांनाच मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एक-दोन दिवसांत फरार आरोपीदेखील ताब्यात येतील. पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी यावेळी दिली.