सामान्यांना रुचेना भीम अॅप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:24 AM2017-11-06T00:24:24+5:302017-11-06T00:24:29+5:30
गेल्यावर्षी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर रोकडरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी भारत सरकारने मोठ्या थाटामाटात सुरू केलेल्या ‘भीम’ या आॅनलाइन पेमेंट अॅपला सामान्यांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गेल्यावर्षी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर रोकडरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी भारत सरकारने मोठ्या थाटामाटात सुरू केलेल्या ‘भीम’ या आॅनलाइन पेमेंट अॅपला सामान्यांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. शहरातील व्यावसायिक, दुकानदार, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांच्याशी चर्चा केली असता भीम अॅपच्या वापरासंबंधी त्यांच्यामध्ये उदासीनता दिसून आली.
चर्चा केलेल्या सुमारे ७० लोकांनी अॅपच्या तांत्रिक बाबतीत सर्वाधिक तक्रारी व्यक्त केल्या. सर्व्हर कनेक्शन एरर, बँक पेअरिंग न होणे, एसएमस व्हेरिफिकेशन प्रक्रिया किचकट आणि खर्चिक, लॉग इन करताना एरर येणे, अशा विविध तक्रारींमुळे ५५ टक्के लोकांनी ‘भीम अॅप’ अनइन्स्टॉल किंवा वापरणे बंद केल्याचे सांगितले.
‘एकदा लॉग इन केल्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा लॉग इन व्हावे लागते. असे परत परत लॉग इन करावे लागत असल्यामुळे अॅप अनइन्स्टॉल केले. स्पर्धक अॅपप्रमाणे युजर फ्रेंडली नसल्यामुळेही वापरताना अनेक अडचणी येतात. सरकारचा हेतू जरी उत्तम असला तरी तांत्रिक बाबींमध्ये या अॅपमध्ये खूप सुधारणा कराव्या लागतील, असे आयटी इंजिनिअर अमोल भालेराव यांनी सांगितले.
‘नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन आॅफ इंडिया’तर्फे (एनपीसीआय) भारत इंटरफेस फॉर मनी (भीम) अॅप तयार करण्यात आलेले आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर त्याचे उद्घाटन केले होते. अगदी साध्या फोनवरून केवळ अंगठ्याच्या ठशाद्वारे पैशांची देवाण-घेवाण करण्याची सुविधा यातून देण्यात आली. विनाइंटरनेटदेखील सामान्यांच्या सोयीचे व ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेंतर्गत टाकलेले क्रांतिपूर्ण पाऊल, असा या अॅपचा प्रचार केला गेला.
सुरुवातीला अँड्राइड स्मार्टफोनवर उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर ते कमी वेळात सर्वाधिक डाऊनलोड होणारे अॅप ठरले. आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी ते डाऊनलोड केलेले आहे. अॅप लाँच झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स विके्रते एम. नाझीर यांनीही ते डाऊनलोड केले; परंतु ग्राहकांकडून त्याला प्रतिसाद न लाभल्याने त्यांनी भीम अॅप अनइन्स्टॉल केले. अॅपची जेवढी चर्चा झाली तेवढा त्याचा वापर झाला नसल्याने दुकानदारांनी सांगितले.
नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यात आघाडीवर राहणाºया तरुणांनाही ‘भीम’बद्दल विशेष आकर्षण नसल्याचे दिसून आले. त्यांचा कल इतर आॅनलाइन पेमेंट सुविधांकडे अधिक आहे. आकर्षक आॅफर्स आणि वापरायला एकदम सोपे यामुळे तरुणाईची त्यांना पसंती मिळते. त्या तुलनेत भीम अॅपचा युजर फे्रंडली नसल्याचे ७५ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले.सरकारचे ‘कॅशलेस’ धोरण प्रशंसनीयच आहे. डेबिट किंवा क्रे डिट कार्डद्वारे पैशांची देवाणघेवाण केल्यास ०.७५ ते १.७५ टक्का अधिक अधिभार आकारला जातो. त्यामुळे भीम अॅपसारखी सुविधा असणे गरजेचे असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. त्याचा नीट प्रचार व लोकांमध्ये जागरूकता करायला हवी, असे ८० टक्के व्यापा-यांना वाटते.