लोक म्हणतात, सिलिंडर,सोयाबीन अन् बेरोजगारी; नेते टाळताहेत, ‘मुद्दे की बात’, चर्चा भलतीकडेच
By नंदकिशोर पाटील | Published: April 27, 2024 05:29 PM2024-04-27T17:29:08+5:302024-04-27T17:29:17+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदारांचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता, राष्ट्रीय मुद्द्यांऐवजी स्थानिक मुद्दे लोकांना महत्त्वाचे वाटतात.
छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान काल पार पडले. निवडणुकीच्या दोन्ही चरणातील प्रचाराचे मुद्दे पाहिले तर, सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या मुद्द्यांना बगल देत, प्रचाराची दिशा भरकटून टाकण्यात आल्याचे दिसून येते. शिवराळ भाषा, अपप्रचार आणि अडगळीला पडलेले जुने विषय उकरून मतांचे ध्रुवीकरण करण्यावर भर दिला जात आहे. मतदारांच्या निरुत्साहामागे हेही एक कारण असू शकते. आमच्या प्रश्नांविषयी कोणी बोलणारच नसेल तर, आम्ही मतदानाला का बाहेर पडावे, असाही सूर दिसून येतो.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदारांचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता, राष्ट्रीय मुद्द्यांऐवजी स्थानिक मुद्दे लोकांना महत्त्वाचे वाटतात. विशेषत: वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या गृहिणी, शेतमालाला भाव नसल्यामुळे हताश झालेले शेतकरी आणि नोकरी मिळत नसल्याने वैफल्यग्रस्त झालेले बेरोजगार, सर्वच राजकीय पक्षांविषयी चीड व्यक्त करत आहेत. नेत्यांच्या पक्षांतराविषयी देखील लोकांमध्ये चीड दिसून आली.
गेल्या पाच वर्षात जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले मात्र शेतकऱ्यांनी पिकविलेला कापूस आणि सोयाबीन आज कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. ६ ऑगस्ट २०२१ रोजी लातूर बाजार समितीत सोयाबीनला दहा हजार ४०० रुपये इतका विक्रमी भाव मिळाला होता. आज तेच सोयाबीन चार ते साडेचार हजार रुपयांत विकले जाते. हमीभावापेक्षाही कमी किमतीत! आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार आणि खाद्यतेलाच्या आयातीचा हा परिणाम. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने ४५ लाख टन कडधान्याची आयात केली. परिणामी, देशांतर्गत शेतमालाचे भाव पडले.
सिलिंडरचे भाव कमी करा
मागील काही वर्षांपासून डिझेल, पेट्रोल आणि गॅस सिलिंडरचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतारावरून ठरविले जात आहेत. मात्र याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसतो. काही राज्यांनी या इंधनावरील अधिभार कमी करून ग्राहकांना दिलासा दिला आहे. मात्र, सर्वच राज्यांनी अधिभार कमी केलेला नाही. निवडणुकीच्या तोंडावर ८ मार्च रोजी केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात शंभर रुपयांची कपात केली. त्याअगोदर गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यात २०० रुपये कमी केले. अशा प्रकारे गेल्या सहा महिन्यात ३०० रुपयांची कपात झाल्याने १२०० रुपयांवर गेलेले सिलिंडर ९०० रुपयांवर आले. मात्र, तरीही ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत सरकारने गॅस सिलिंडर देऊन महिलांचे चुलीसमोरचे कष्ट कमी केले. पण भाव कमी करावेत, अशी महिलांची अपेक्षा आहे.
नोकर द्या अथवा मुलगी !
बेरोजगार युवकांची दुहेरी समस्या आहे. शिक्षण असून नोकरी मिळत नाही आणि नोकरी नाही म्हणून लग्नाला मुलगी मिळत नाही. देशात सध्या बेरोजगारीचा दर उच्चांकी पातळीवर आहे. ‘नॅशनल सॅम्पल सर्व्हे’नुसार २० ते २९ वयोगटातील तरुणांमधील बेरोजगारीचा दर १४.२३ टक्के इतका आहे. नोटाबंदी, जीएसटी, कोविड महामारी आणि चलनवाढीमुळे औद्योगिक आणि व्यवसायवृद्धी खुंटली. त्याचा हा परिणाम आहे. लग्नाळू युवक म्हणतात, सरकारने आम्हाला एक तर नोकरी द्यावी अथवा लग्नासाठी मुलगी. कारण नोकरी नसल्याने लग्नाचे वय निघून जात आहे, ही चिंता.
पाणी प्रश्न गंभीर
औद्योगिक क्षेत्राचा विकास न झाल्यामुळे जिल्ह्यात बेरोजगार तरुणांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील पाणीप्रश्न मिटल्यास अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला शेतीच्या माध्यमातून काम मिळेल. बागायत क्षेत्र नसल्यामुळे अनेक शेतकरी मुलांचे लग्न होण्यास देखील अडचणी येत आहे. उद्योग, नवे प्रकल्प जिल्ह्यात आणण्याची गरज आहे.
- गौतम घिगे, बीड
शिक्षण घेऊन बेरोजगार
दहा वर्षांपूर्वी मी डी.एड. केलं. शासकीय भरती न झाल्याने नोकरी मिळू शकली नाही. आता कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नागेवाडी टोलनाक्यावर काम करीत आहे. शासनाने वेळोवेळी नोकरभरती करून सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न मार्गी लावावेत.
- अभिजीत राजेजाधव, जालना
शेतमालाला हमी भाव हवा
शेतकऱ्यांसमोर एक ना अनेक संकटे आहेत. शेतमालाला हमीभाव नाही. मागील चार-पाच वर्षांपूर्वी सोयाबीनला ५५०० ते ६००० रुपये भाव होता. आता सोयाबीनला ४२०० ते ४५०० रुपयांचा दर आहे. सोयाबीनला एकरी १६ हजारांचा खर्च येतो. उत्पन्न १२ हजारांचे हाती पडले आहे.
-काकासाहेब अंभोरे, शेतकरी सेलगाव, ता. बदनापूर
शेतकऱ्यांना रडण्याची वेळ
उत्पादन खर्चाइतकेही उत्पन्न झाले नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे ४० टक्केसुद्धा पीक आले नाही. सुरुवातीला ३५०० ते ४२०० रुपये हमीपेक्षा कमी भाव मिळाला. नंतर ४५०० रुपयांच्या पुढे भाव गेला नाही. उत्पादन खर्चाइतके उत्पन्न झाले नाही. शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली.
- अर्जुन रामभाऊ बुनगुले, आडगाव, ता. बीड.
महागाई कमी होईना
४०० रुपयांना मिळणारा गॅस ११०० वर झाला. त्यात रेशनचा काळा बाजार. स्वयंपाक करायचा कसा? चूल बंद करा म्हणता, दुसरीकडे गॅसचे भाव गगनाला भिडले. महागाई काही केल्या कमी होईना झाली.
-नीता वैजिनाथ उबाळे, गृहिणी, चऱ्हाटा, ता. बीड
गॅसचे दर वाढले
दहा वर्षांपूर्वी घरगुती गॅस वापरणाऱ्या गृहिणींची संख्या कमी होती. त्या तुलनेत ती आता वाढली आहे. दहा वर्षांपूर्वी शहराच्या ठिकाणाहून गॅस आणला जायचा. आता गावातच मिळतो. परंतु, दहा वर्षात गॅसचे दर वाढले असून, ८५० रुपयांवर दर गेले आहेत.
- प्रेरणा हिसवणकर रांजणी, ता. घनसावंगी