लोकांना बदल हवा होता; विजयानंतर इम्तियाज जलील यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 03:06 PM2019-05-24T15:06:23+5:302019-05-24T15:08:58+5:30
शेवटच्या टप्प्यात तर जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यातला सामना चांगलाच रंगला होता.
औरंगाबाद : ‘लोकांना बदल हवा होता’अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आपल्या विजयानंतर इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली. मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात तर जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यातला सामना चांगलाच रंगला होता. क्षणाक्षणाला उत्सुकता ताणली जात होती. जो जिंकून येईल, तो थोड्या मतांनी, हे स्पष्ट झाले होते. पहिल्या फेरीपासून आधी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेले आणि नंतर दुसऱ्या क्रमांकावर आलेले चंद्रकांत खैरे यांनी २१ व्या फेरीनंतर पाच हजार मतांनी जलील यांना मागे टाकले आणि शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. नंतर मात्र जलील हे मताधिक्य घेत राहिले आणि शेवटी ते विजयी झाले.
इम्तियाज जलील हे पत्रकारितेतून राजकारणात आलेले आहेत. २०१४ साली पहिल्यांदाच त्यांनी औरंगाबाद मध्यची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. आता त्यांनी पहिल्यांदाच खासदारकी लढवली आणि विजयी झाले.
त्यांनी सांगितले की, औरंगाबादच्या प्रश्नांची मला चांगली जाण आहे. कचऱ्याचे शहर ही औरंगाबादची प्रतिमा मला बदलायची आहे. मागच्या २०-२५ वर्षांपासून शहराच्या विकासाला ब्रेक लागला आहे. आशिया खंडात सर्वाधिक प्रगतीचे शहर म्हणून औरंगाबादची प्रतिमा होती. सर्व नागरिकांना सोबत घेऊन मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याचे व शहराला प्रगतिपथावर नेण्याचे काम मला करावयाचे आहे.
आमदार म्हणून काम करताना जलील यांनी विधानसभेत अनेक प्रश्न मांडले. शहरवासीयांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यावर त्यांचा भर राहिला. आता त्यांना मनपाच्या कामांत लक्ष घालत इथले, औद्योगिकीकरण, बेरोजगारांचे प्रश्न, विमान, रेल्वेविषयक सुविधांमध्ये वाढ, समांतर जलवाहिनीचा अत्यंत गाजलेला प्रश्न यांना प्राधान्य द्यावयाचे आहे.
५ कारणे विजयाची
- दलित-मुस्लिम एकगठ्ठा मतांच्या जादूचा एमआयएमला लाभ.
- अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी घडविले खैरेंच्या मताचे विभाजन.
- ग्रामीण व शहरी भागातील मतदानही काँग्रेसला मिळवता आले नाही.
- शहरातील नागरी समस्यांमुळे खैरेंना विरोध. चार टर्ममुळे आली अॅन्टीइन्कम्बन्सी
- शिवसेनेच्या मतविभाजनामुळे एमआयएम एकतर्फी जिंकले.