'लोकच म्हणतील, लाव रे तो व्हिडिओ'; संभाव्य भाजपा-मनसे युतीवर वडेट्टीवारांचा चिमटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 08:10 PM2021-08-06T20:10:03+5:302021-08-06T20:14:23+5:30
Vijay Vadettivar News : देशातच ओबीसींना वगळून निवडणुका होणे शक्य नाही.
औरंगाबाद: भाजपा (BJP ) आणि मनसे ( MNS) युतीबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thakarey ) आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांची आज पुन्हा बैठक झाली. यावर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ( Vijay Vadettivar) यांना विचारले असता ते म्हणाले, ही युती झाली तर लोकच आधी म्हणतील, लाव रे तो व्हिडिओ. हे त्यांचेच प्रेमळ शब्द आहेत. मी मनाने तर काही म्हटलेलो नाही, असा चिमटा त्यांनी संभाव्य मनसे व भाजपा युती चर्चेबाबत काढला.
विजय वडेट्टीवार दोन दिवस औरंगाबाद-जालन्याच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी सायंकाळी ते औरंगाबादेत आले. विभागीय आयुक्तालयात मराठवाड्यातील आश्रम शाळांच्या समस्यांबाबत आढावा बैठक घेण्यापूर्वी त्यांना पत्रकारांनी बोलते केले. ते म्हणाले, मागसवर्ग आयोगासाठी लागणारा जो निधी आहे, ते देण्यात येईल. ओबीसी आरक्षणपेक्षा निधी मोठा नाही. आम्हाला हक्काचे आरक्षण मिळावे आणि ते टिकावे हीच भूमिका आहे. यासाठी माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या आठवड्यात सुनावणी होणे शक्य आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
ओबीसींना वगळून निवडणुका शक्य नाहीत
ओबीसी आरक्षणाचा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादीत नाही, तो पुर्ण देशासाठी लागू झालेला आहे. त्यामुळे देशातच ओबीसींना वगळून निवडणुका होणे शक्य नाही. त्यासाठी इम्पिरीकल डाटा सर्व राज्यांना मिळवावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने केंद्रशासनाकडून तो डाटा मिळावा, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.