पाणंदमुक्तीसाठी लोकसहभाग चळवळ
By Admin | Published: May 7, 2017 12:01 AM2017-05-07T00:01:16+5:302017-05-07T00:02:42+5:30
गेवराई : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत गेवराई नगर पालिकेचे ८७ टक्के काम वर्षभरात पूर्ण करण्याची किमया सीओ भागवत बिघोत यांनी करून दाखवली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत गेवराई नगर पालिकेचे ८७ टक्के काम वर्षभरात पूर्ण करण्याची किमया सीओ भागवत बिघोत यांनी करून दाखवली आहे. शासन योजना लोकसहभागाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही हे लक्षात घेऊन गेवराईतील प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन बिघोत यांनी जून २०१६ मध्ये काम सुरू केले.
गेवराई शहराची लोकसंख्या ३५ हजाराच्या आसपास आहे. जून २०१६ ला भागवत बिघोत यांनी गेवराई नगरपालिकेचा सीओ पदाचा पदभार स्वीकारला. बिघोत यांनी परभणी विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. पूर्वी त्यांनी फौजदार म्हणूनही काम केलेले आहे. समन्वय साधत काम करण्याची त्यांची हातोटी आहे. फौजदारपदाचा राजीनामा देऊन त्यांनी गेवराई येथे ते सीओ म्हणून रुजू झाले. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत गेवराई शहरामध्ये २१६० शौचालये बांधण्याचे त्यांना उद्दिष्ट दिले होते. गेवराई शहराला पाणंदमुक्त करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. सुरूवातीला त्यांनी कर्मचारी व नगरसेवक यांच्याशी समन्वय साधत शहरातील प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन भेटी दिल्या. नागरिकांशी चर्चा करून शौचालयाचे महत्त्व पटवून दिले. बिघोत व त्यांचे कर्मचारी दररोजी सकाळी दोन तास शहराचा फेरफटका मारत. उघड्यावर प्रात:र्विधी करणाऱ्यांना शौचालयाचे महत्त्व पटवून देत बांधण्यासाठी प्रोत्साहित करीत असत. पाहता पाहता त्यांनी गेवराई शहरात केवळ एका वर्षात १८८० शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. उर्वरित २८० शौचालयांचे काम प्रगतीपथावर असून, जून अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसहभागाबद्दल विचारले असता ते म्हणाले, शासनाची योजना लोकसहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे काम करताना लोकांचा व लोकप्रतिनिधींचा विश्वास संपादन करणे हेच महत्त्वाचे आहे. त्याशिवाय कामे मार्गी लागत नाहीत.