वॉटरग्रीडच्या बैठकीला मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:07 PM2019-06-10T23:07:29+5:302019-06-10T23:08:27+5:30
मराठवाडा दुष्काळाने होरपळतो आहे. त्यामुळे भविष्यात विभागातील शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी ‘वॉटरग्रीड’ निर्मितीचा विचार २०१६ साली पुढे आला. त्याचे भूमिपूजन येत्या काही महिन्यांत होण्याची शक्यता असून ती योजना नेमकी काय आहे, हे समजावे, यासाठी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीला विभागातील बहुतांश लोकप्रतिनिधींनी दांडी मारली.
औरंगाबाद : मराठवाडा दुष्काळाने होरपळतो आहे. त्यामुळे भविष्यात विभागातील शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी ‘वॉटरग्रीड’ निर्मितीचा विचार २०१६ साली पुढे आला. त्याचे भूमिपूजन येत्या काही महिन्यांत होण्याची शक्यता असून ती योजना नेमकी काय आहे, हे समजावे, यासाठी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीला विभागातील बहुतांश लोकप्रतिनिधींनी दांडी मारली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठी योजना विभागात होण्याचे संकेत असतानाच लोकप्रतिनिधींनी दांडी मारल्यामुळे या योजनेबाबतचे गौडबंगाल वाढले आहे.
या बैठकीला मराठवाड्यातील पालकमंत्री, विधान परिषद, विधानसभा सदस्य, जि.प. अध्यक्षांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ. भाऊसाहेब चिकटगावकर व अन्य एक विधानसभा सदस्याची व परभणी जि.प. अध्यक्षांची बैठकीला हजेरी होती. पालकमंत्री, आमदार, महापौर यांना निमंत्रित केलेले असताना ते का आले नाहीत, यावर पाणीपुरवठामंत्री लोणीकर यांनी सांगितले, वॉटरग्रीडच्या बैठकीसाठी सर्वांना फोन केले होते; परंतु अनेक जण आले नाहीत.
आॅक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ग्रीडच्या कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तरतूद करण्यात आली. पहिल्या टप्प्यात उजनीतील पाणी मांजरा धरणात आणून मराठवाड्यातील ४० टक्के गावांना पाणीपुरवठा करणे. त्यासाठी ६ हजार ५०० कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात इसापूरचे पाणी उर्ध्व मानार धरणक्षेत्रात आणणे, तसेच जायकवाडीवरील धरणाक्षेत्रातून पाणी आणणे. जायकवाडीचे पाणी माजलगाव धरणक्षेत्रात नेणे. ८ जिल्ह्यांतील ६० टक्के गावांना पाणीपुरवठा करणे. यासाठी ८ हजार ५०० कोटी असा १५ हजार कोटींचा वॉटरग्रीड प्रकल्प होता. १५ कोटी (डीपीआर) सविस्तर प्रकल्प अहवालासाठी तरतूद करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी एकत्रित ग्रीड करण्याच्या सूचना केल्या.
शिवसेनेची बैठकीकडे पाठ
आजवर जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही बैठकीला हजेरी लावणारे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, महापौर, जि.प. अध्यक्षांनी मराठवाडा वॉटरग्रीडच्या बैठकीकडे पाठ फिरविली. १५ दिवसांनंतर मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत, त्या बैठकीला सर्वजण उपस्थित राहतील, असा विश्वास लोणीकर यांनी व्यक्त केला.