जलजीवन मिशनच्या कामांत हयगत भोवली; ६५ कंत्राटदारांवर प्रतिदिन दंडात्मक कारवाई
By विजय सरवदे | Published: November 13, 2023 03:24 PM2023-11-13T15:24:02+5:302023-11-13T15:25:18+5:30
‘सीईओ’ मीना ॲक्शन मोडवर : मार्च २०२४ पर्यंत योजना पूर्ण होण्याची साशंकता!
छत्रपती संभाजीनगर : टंचाईग्रस्त गावांसाठी आशेचा किरण असलेल्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची ११६१ कामे हाती घेण्यता आली असून ती मार्च २०२४ पर्यंत पूर्ण व्हावीत, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र, अद्यापही ५१ कामे सुरूच झालेली नाहीत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी ॲक्शन मोडवर आले असून कामांत हयगय करणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध त्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. यात २७ कंत्राटदारांना प्रतिदिन २ हजार रुपये, १२ कंत्राटदारांंना प्रति दिन ५०० रुपये, तर २६ कंत्राटदारांना प्रतिदिन २०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील १२४१ गावांना कायमस्वरूपी शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी वर्षभरापूर्वी ११६१ कामांचे वाटप झाले. या योजनेंतर्गत प्रति माणशी प्रति दिन ५५ लिटर शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. निश्चित केलेल्या कालमर्यादेत ही कामे पूर्ण व्हावीत, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, तसेच पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे हे सातत्याने कामांचा आढावा घेत आहेत; परंतु काही ठिकाणी गावातील राजकारण, सरपंच आणि कंत्राटदारांमधील मतभेद या गोष्टीमुळे अद्यापपर्यंत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ४, गंगापूर- ६, कन्नड- ९, खुलताबाद- ६, पैठण- ११, फुलंब्री- ९, सोयगाव- २ आणि वैजापूर तालुक्यातील ४ अशी एकूण ५१ कामे सुरूच झालेली नाहीत. दरम्यान, सरपंच आणि कंत्राटदारांमधील मतभेद दूर करण्यासाठी ‘सीईओ’ मीना यांनी ग्रामसेवक, सरपंच आणि कंत्राटदारांची आमनेसामने सुनावणी घेऊन कामे गतीने करण्याच्या सूचना दिल्या; पण त्याचाही फारसा परिणाम दिसून आला नाही. त्यामुळे ‘सीईओ’ मीना यांनी आता कंत्राटदारांविरुद्ध कारवाईचे हत्यार उपसले आहे. सातत्याने सांगितल्यानंतरही कामांत सुधारणा नसलेल्या ६५ कंत्राटदारांना दंड, तर १० गावांतील कामांची फेरनिविदा काढण्यात आली आहे.
१० गावांतील कामांची फेरनिविदा
जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत योजनांच्या कामांमध्ये सुधारणा होत नसल्यामुळे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिंपळगाव पांढरी, गोलवाडी, गंगापूर तालुक्यातील धामोरी, सूर्यवाडी, कन्नड तालुक्यातील टापरगाव, लामणगाव- धरणखेडा, खुलताबाद तालुक्यातील वडोद खुर्द, निरगुडी बुद्रुक आणि पैठण तालुक्यातील तारूपिंपळवाडी, सोमपुरी या १० गावांतील कामांच्या फेरनिविदा काढण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी सांगितले.