'परफॉर्मन्स ऑडिट' झाले, छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटीचे भविष्य काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 07:40 PM2024-08-23T19:40:19+5:302024-08-23T19:41:20+5:30
महालेखाकार कार्यालयाच्या मुंबई येथील पथकाने सलग आठ दिवस राहून छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटी कार्यालयाचे ऑडिट केले.
छत्रपती संभाजीनगर : केंद्र-राज्य शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे पहिल्यांदाच परफॉर्मन्स ऑडिट करण्यात आले. मुंबई येथील महालेखाकार कार्यालयातील एका पथकाने मागील आठ दिवसांत स्मार्ट सिटीत ऑडिट केले. या ऑडिटचा अहवाल थेट केंद्र शासनाला सादर करण्यात येणार आहे. देशभरातील शंभर स्मार्ट सिटीचे ऑडिट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या अहवालावरून स्मार्ट सिटीचे पुढील भविष्य ठरणार आहे.
केंद्र शासनाने देशभरातील शंभर शहरांचा स्मार्ट सिटीत समावेश केला. त्यात राज्यातील आठ शहरांचा समावेश आहे. आठमध्ये छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महालेखाकार कार्यालयाच्या मुंबई येथील पथकाने सलग आठ दिवस राहून छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटी कार्यालयाचे ऑडिट केले. हा अहवाल लवकरच केंद्र शासनाला सादर होईल. यापूर्वी डिसेंबर २०२३ पर्यंत परफॉरमन्स ऑडिट करण्यात आले होते. ‘स्मार्ट सिटी’ची मुदत दि. ३० जून २०२४ पर्यंत होती. त्यानंतर दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. केंद्रीय अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी २.० संदर्भात आर्थिक तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्राने स्मार्ट सिटीचा उल्लेख केला नाही. भविष्यात केंद्राकडून स्मार्ट सिटी २.० प्रकल्प राबविला जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
फायलींची बारकाईने तपासणी
ऑडिटसाठी आलेल्या पथकाने डिसेंबर ते जून या सहा महिन्यांचे ऑडिट केले. ऑडिटसाठी वेगवेगळ्या फायली अत्यंत बारकाईने तपासण्यात आल्या. फायलींच्या झेरॉक्स प्रती त्यांनी सोबत नेल्या. ‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातून करण्यात आलेली कामे, कामे करताना नियम, निकष पाळण्यात आले का? निर्धारित वेळेत कामे झाली का? कामे करण्याची गती कशी होती, त्याची गुणवत्ता, आदींबाबत ऑडिट करताना नोंद घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.