स्वरचैतन्यातून शाश्वत आनंदानुभूती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 01:26 AM2017-10-22T01:26:20+5:302017-10-22T01:26:20+5:30

पाश्चात्त्य संगीत आणि भारतीय रागदारी संगीताचा अनोखा मिलाफ स्वरचैतन्यातून शाश्वत आनंदानुभूती देणारा ठरला. ‘अविस्मरणीय दिवाळी पहाट’ असाच उत्स्फूर्त उल्लेख करून दर्दी रसिकांनी या सांगीतिक सोहळ्याला दाद दिली. दिशा ग्रुप प्रस्तुत लोकमत स्वरचैतन्याची दिवाळी पहाटचे हे दुसरे वर्षे नावीन्यपूर्ण ठरले

 Permanent bliss of self-consciousness ... | स्वरचैतन्यातून शाश्वत आनंदानुभूती...

स्वरचैतन्यातून शाश्वत आनंदानुभूती...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दिवाळी पाडव्याची पहाट... पक्ष्यांचा किलबिलाट... लोकमतच्या हिरवळीवरील रंगमंचावर सरस्वती देवीच्या दर्शनाने शेकडो रसिकांची झालेली प्रसन्न मने... विश्वविख्यात ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. अजय पोहनकर यांनी छेडलेले ‘अलबेला साजन आयो रे’ सूर... नव्या युगाचा संगीतकार अभिजित पोहनकर यांनी शास्त्रीय संगीताचे की-बोर्डद्वारे केलेले फ्यूजन... तबला, बासरीच्या सुरावटीने निर्माण झालेले स्वगीतध्वनी... आणि अभिनेता मकरंद देशपांडे यांनी सादर केलेल्या शृंगाररसातील काव्याने प्रत्येक मनावर गारुड घातले... पाश्चात्त्य संगीत आणि भारतीय रागदारी संगीताचा अनोखा मिलाफ स्वरचैतन्यातून शाश्वत आनंदानुभूती देणारा ठरला. ‘अविस्मरणीय दिवाळी पहाट’ असाच उत्स्फूर्त उल्लेख करून दर्दी रसिकांनी या सांगीतिक सोहळ्याला दाद
दिली.
दिशा ग्रुप प्रस्तुत लोकमत स्वरचैतन्याची दिवाळी पहाटचे हे दुसरे वर्षे नावीन्यपूर्ण ठरले. मैफलीबद्दल कमालीची उत्सुकता, उत्साह शहरातील दर्दी रसिकांमध्ये होता, तो २० रोजी पहाटे पाहण्यास मिळाला. ५.१५ वाजेपासूनच लोकमतच्या हिरवळीवर रसिकांच्या आगमनाला सुरुवात झाली होती.
शहनाई चौघडाच्या सुरांनी पहाटेचे रम्य वातावरण मंगलमय बनविले होते. या मंगलवाद्याने प्रत्येकाचे स्वागत करण्यात येत होते. गेटमधून प्रवेश करताच समोर गणपतीची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. रंगमंचावर मुकुंद गोलटगावकर यांनी साकारलेली सरस्वती देवीची देखणी मूर्ती व पाठीमागील बाजूस मंदिर व शिल्पाकृतीच्या देखाव्याने उपस्थितांची मने प्रसन्न झाली... भारतीय शास्त्रीय की-बोर्ड वादक, फ्यूजन संगीताचे निर्माते आणि कंपोझर अशा अनेक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेले अभिजित पोहनकर यांनी शास्त्रीय राग की-बोर्डवर वाजविण्याची नवीन कल्पना प्रत्यक्षात आणली. त्यांचा ‘पिया बावरी’ हा भारतातील सगळ्यात लोकप्रिय फ्युजन संगीताच्या अल्बममधील काही रचना त्याने की-बोर्डवर छेडल्या आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्याच्या नवीन कल्पनेला जोरदार दाद दिली. की-बोर्ड, गिटार, बासरी व तबला वादनाच्या जुगलबंदीत सारेच हरखून गेले होते. फ्यूजन काय असते याची नव्याने प्रचीती तमाम कानसेनांना यावेळी आली. याच बहरलेल्या वातावरणात पं. अजय पोहनकर यांनी आपल्या मातोश्री किराणा घराण्याच्या गायिका डॉ.सुशीला पोहनकर यांची बंदिश ‘कोयलिया काहे करत पुकार’ हे बिलासखानी तोडीतील रागदारी सादर करून उपस्थिताना पाश्चात्य संगीत व भारतीय शास्त्रीय रागदारीची वेगळीच अनुभूती मिळवून दिली.
यानंतर पंडितजींनी ‘याद प्रिया की आये, तू जहाँ जहाँ चलेगा, कोयलीया कुहु कुहु सुनाये’ या वेगवेगळ्या रागातील रचनांचे मिश्रण करून अनोखा प्रयोग सादर करून सर्वांची वाहवा मिळविली. जुन्या गाण्याला नवीन साज चढवीत स्थानिक कलाकार वैशाली कुर्तडीकर यांनी ‘केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली’ हे गीत गाऊन सर्वांची दाद मिळविली. ‘हे मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया’ ही गजलही पंडितजींनी तेवढ्याच ताकदीने सादर केली. ‘कैसे कटे दिन रेन सजन के’ ही ठुमरीही नवीन अंदाजमध्ये सादर करून या सांगीतिक सोहळ्याची सांगता झाली. गिटारवर सुशांत शर्मा, बासरी शशांक आचार्य व अमित मिश्रा यांनी तबल्याची सुरेख साथ देऊन फ्यूजन गाजविले. स्थानिक गायक सचिन नेवपूरकर यांनी साथ केली. कार्यक्रम संपल्यावर पं.अजय पोहनकर, अभिजित पोहनकर व अभिनेते मकरंद देशपांडे यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. सूत्रसंचालन प्राजक्ता सुपेकर हिने केले. यावेळी अगत्य केटरर्सने तयार केलेल्या स्वादिष्ट्य फराळाचा सर्वांनी आस्वाद घेतला.

Web Title:  Permanent bliss of self-consciousness ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.