कायमस्वरूपी लायसन्ससाठी ‘आरटीओ’चे ड्रायव्हिंग स्कूलशी साटेलोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 05:00 PM2019-06-12T17:00:09+5:302019-06-12T17:02:30+5:30
स्कूलच्या उमेदवारांची चाचणी बाहेर, तर नागरिकांची कार्यालयात
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात कायमस्वरूपी लायसन्ससाठी चक्क दोन वेगवेगळ्या पद्धतींनी चाचणी घेतली जात आहे. मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रशिक्षणार्थींची कार्यालयाबाहेर रस्त्यावर, तर स्वत:हून सर्व प्रक्रिया पूर्ण करून चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांची कार्यालयातील ट्रॅकवर चाचणी घेतली जात आहे. सार्वजनिक रस्त्याच्या नावाखाली मैदानांवर, निर्मनुष्य रस्त्यावर चाचणी घेतली जात असून, आरटीओ कार्यालयाने ड्रायव्हिंग स्कूलशी हातमिळविणी केल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.
आरटीओ कार्यालयाने २८ फेब्रुवारी रोजी दुचाकी वगळता सर्व वाहनांच्या कायमस्वरूपी लायसन्ससाठी घेण्यात येणारी चाचणी कार्यालयाबाहेरील सार्वजनिक रस्त्यावर घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची महिनाभरापूर्वी अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, कार्यालयाबाहेर फक्त मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या उमेदवारांची चाचणी घेतली जात आहे. मोटार ड्रायव्हिंग स्कूलव्यतिरिक्त लायसन्ससाठी येणाऱ्यांची कार्यालयातील ट्रॅकवर चाचणी घेतली जात आहे. यासाठी कार्यालयात एच आकाराचा आणि सरळ रस्त्याचा ट्रॅक आहे. त्यावर ही चाचणी द्यावी लागते. ही चाचणी देताना वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडताना दिसत आहे. ड्रायव्हिंग स्कूलच्या उमेदवाराची सार्वजनिक रस्त्यावर चाचणी घेतली जात आहे; परंतु सार्वजनिक रस्त्याच्या नावाखाली रेल्वेस्टेशन, बीड बायपास, सिडको, वाल्मी परिसरातील मैदान आणि निर्मनुष्य रस्त्यावर चाचणी घेतली जात असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. एकाच चाचणीसाठी वेगवेगळी चाचणी पद्धत घेण्यामागे शंका उपस्थित केली जात आहे. राज्यात अशी चाचणी पद्धत कुठेच नसून, सार्वजनिक रस्त्यावर चाचणी घेतलेल्यांची कार्यालयातील ट्रॅकवर पुन्हा चाचणी घेतली, तर ९० टक्के उमेदवार नापास होतील, असा दावाही केला जात आहे.
शहरात आजघडीला ४५ वैध ड्रायव्हिंग स्कूल आहेत. कायमस्वरूपी लायसन्ससाठी दररोज ८० ते ९० जणांची चाचणी घेतली जाते. यामध्ये कार्यालयाबाहेर जवळपास ५० आणि कार्यालयात ३० जणांची चाचणी घेतली जात आहे. यामध्ये कार्यालयातील २० टक्के उमेदवार चाचणीत नापास होतात, तर कार्यालयाबाहेरील चाचणीतील नापास होणाऱ्यांचेही प्रमाण तेवढेच असल्याचा दावा आरटीओ अधिकाऱ्यांनी केला.
नियमानुसार चाचणी
ड्रायव्हिंग स्कूलकडून येणारे उमेदवार हे प्रशिक्षित असतात. त्यामुळे त्यांची सार्वजनिक रस्त्यावर चाचणी घेतली जाते. त्यांच्या बाजूला निरीक्षक बसलेले असतात. इतरांची चाचणी ही कार्यालयात घेतली जाते. ही सर्व प्रक्रिया नियमानुसार होत आहे. मैदानावर चाचणी घेतली जात नाही. तसे होत असल्याचे निदर्शनास आले, तर संबंधित निरीक्षकावर कारवाई केली जाईल.
- स्वप्नील माने,सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी
निर्णयाची अंमलबजावणी
आरटीओ कार्यालयाने घेतलेल्या निर्णयाची मोटार ड्रायव्हिंग स्कूलचालकांकडून अंमलबजावणी केली जात आहे. स्वत:हून सर्व प्रक्रिया पूर्ण करून चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांनी मागणी केली, तर त्यांचीही चाचणी सार्वजनिक रस्त्यावर घेतली जाऊ शकते. स्कूलच्या प्रशिक्षणार्थींची मैदानावर चाचणी घेतली जात नाही आणि कोणाशीही कोणतीही हातमिळविणी झालेली नाही.
- देवेंद्र पांडे,अध्यक्ष, मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन