कायमस्वरूपी विक्री केंद्राला नऊ वर्षांपासून अवकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:05 AM2021-09-03T04:05:14+5:302021-09-03T04:05:14+5:30
बाबासाहेब धुमाळ वैैैजापूर : शहरातील येवला रस्त्यावरील ‘तालुकास्तरीय कायमस्वरूपी विक्री केंद्राच्या’ इमारतीचे बांधकाम गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेले आहे. दुरवस्थेत ...
बाबासाहेब धुमाळ
वैैैजापूर : शहरातील येवला रस्त्यावरील ‘तालुकास्तरीय कायमस्वरूपी विक्री केंद्राच्या’ इमारतीचे बांधकाम गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेले आहे. दुरवस्थेत पडलेल्या या इमारतीत आता जनावरांसह डुकरांचा मुक्तसंचार वाढला आहे. तर ही शासकीय इमारत आता अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहे. प्रशासनाने या इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याअगोदरच तिला अवकळा लागली आहे.
केंद्राच्या ग्रामीण विकास विभागामार्फत येथील येवला रस्त्यावरील तालुकास्तरीय कायमस्वरूपी विक्री केंद्राच्या बांधकामासाठी ४० लाखांचा निधी मंजूर देण्यात आला. ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मराठमोळ्या, हस्तकला, रानमेवा, ज्वेलरी, रेडिमेड गारमेंट्स, शोभेच्या वस्तू व विविध खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने या विक्री केंद्रास सन २०११-१२ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. या विक्री केंद्रासाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. केंद्र शासनाकडून ८० टक्के तर राज्य शासनाकडून २० टक्के निधीची मंजुरी या कामासाठी मिळालेली आहे.
यात दोन हॉल व सहा गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. या इमारतीचे बांधकाम झाले खरे, परंतु इमारतीची अन्य विविध कामे सध्या अपूर्णावस्थेत आहेत. आतापर्यंत या कामावर ३० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु दरम्यानच्या काळात या इमारतीचे काम बंद पडले. याच काळात या इमारतीच्या बांधकामासाठी आणखी निधीची आवश्यकता असल्याचे पंचायत समिती कार्यालयाकडून औरंगाबाद येथील प्रकल्प संचालक कार्यालयास कळविण्यात आले. दोन वर्षांपूर्वी पंचायत समितीने या कामासाठी आणखी ७५ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे कळविले आहे. सहा महिन्यांपूर्वी निधीचे स्मरणपत्र दिले आहे. पण अद्यापही इमारतीच्या बांधकामाचे भिजत घोंगडे आहे.
----
बांधकाम देखरेखीखाली, निकृष्ट दर्जाचे काम
प्रकल्प संचालक कार्यालय औरंगाबाद, गटविकास अधिकारी व पंचायत समिती बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याच्या नियंत्रणाखाली या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. केवळ केंद्राकडून आतापर्यंत निधी प्राप्त न झाल्याची सबब पुढे करून या इमारतीचे बांधकाम आतापर्यंत रेंगाळत पडले आहे. शासनाने या इमारतीच्या बांधकामासाठी लाखो रुपये खर्च केले. परंतु ही इमारत अपूर्णावस्थेत असल्याने सध्या धूळखात पडून आहे. सध्या ही इमारत अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली असून इमारतीच्या चोहोबाजूंनी अतिक्रमण करण्यात आले आहे.
---
फोटो कॅप्शन वैजापूर शहरातील येवला रस्त्यावर असलेल्या तालुकास्तरीय कायमस्वरूपी विक्री केंद्राच्या याच इमारतीचे गेल्या नऊ वर्षांपासून रखडून पडलेले काम
020921\img_20210902_145453.jpg
फोटो