महापौरांवर भिरकावली खुर्ची, एमआयएमच्या दोन नगरसेवकांचे कायमस्वरूपी निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 03:46 AM2017-10-17T03:46:05+5:302017-10-17T03:46:28+5:30
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी दुपारी एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी पाणी प्रश्नावरून अभूतपूर्व गोंधळ घातला. सभागृहात सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की करीत नगरसेविकांसमोर शिवीगाळ केली.
औरंगाबाद : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी दुपारी एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी पाणी प्रश्नावरून अभूतपूर्व गोंधळ घातला. सभागृहात सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की करीत नगरसेविकांसमोर शिवीगाळ केली. तसेच त्यांनी सभागृहातील प्लास्टिकची खुर्ची महापौरांच्या अंगावरच भिरकावली. या वर्तणुकीबद्दल एमआयएमच्या दोन नगरसेवकांचे सभागृहातील सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात आले.
महापौर बापू घडमोडे यांचा कार्यकाल २८ आॅक्टोबर रोजी संपत आहे. त्यापूर्वी त्यांनी शेवटची नियमित सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. सभेत सर्वप्रथम पाणी प्रश्नावर चर्चा घेण्याचा आग्रह सर्वपक्षीय नगरसेवकांनी धरला. महापौरांनीही आपले शेवटचे मनोगत व्यक्त करून चर्चा सुरू केली. या चर्चेदरम्यान एमआयएम आणि भाजपा नगरसेवक आक्रमक झाले. त्यामुळे एमआयएम नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर धावून आले.
यावेळी राजदंडाची सुरक्षा करण्यासाठी सुरक्षारक्षक प्रमुख जाधव पुढे सरसावले. एमआयएम समर्थक तथा अपक्ष नगरसेवक अजीम अहेमद यांनी जाधव यांना ढकलून दिले. तेवढ्यात एमआयएमचे नगरसेवक शेख जफर (बिल्डर) आणि सय्यद मतीन त्यांच्या अंगावर धावून गेले. या गोंधळामुळे महापौरांनी नगरसेवक अजीम अहेमद, सय्यद मतीन, शेख जफर यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याची घोषणा करून सभा तहकूब केली. चिडलेल्या मतीन आणि जफर यांनी महापौरांच्या दिशेने खुर्च्या भिरकावण्यास सुरुवात केली. याच दरम्यान, नगरसेवक मतीन, जफर यांनी महापौरांच्या समोर ठेवलेला राजदंड पळवून नेला. अखेर सुरक्षारक्षकांनी राजदंड जप्त करून परत महापौरांसमोर आणून ठेवला.
गोंधळाचा अहवाल शासनाकडे पाठवा
महापौरांनी अपक्ष नगरसेवक अजीम अहेमद यांना सदस्यत्व बहाल करून मतीन आणि जफर यांना सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले. दोघांवर गुन्हा दाखल करावा, त्यांच्या गोंधळाचा अहवाल शासनाकडे पाठवा, असे आदेश महापालिका प्रशासनाला दिले. थोड्या वेळात सभागृहात पोलीस दाखल झाले. त्यांनी एमआयएमच्या गोंधळी नगरसेवकांना ताब्यात घेतले. नगरसेविकांनी पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली.