८ फटाका मार्केटला पोलिसांनी नाकारली परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 01:35 AM2017-10-15T01:35:40+5:302017-10-15T01:35:40+5:30
पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शनिवारी रात्री नागरी वसाहतीमधील वेगवेगळ्या ठिकाणच्या ८ फटाका मार्केटला परवानगी नाकारली.
औरंगाबाद : जनतेच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही, असे स्पष्ट करीत सर्व प्रकारचे दबाव झुगारून लावत पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शनिवारी रात्री नागरी वसाहतीमधील वेगवेगळ्या ठिकाणच्या ८ फटाका मार्केटला परवानगी नाकारली.
गतवर्षी जिल्हा परिषद मैदानावरील फटाका मार्केट आगीत जळून खाक झाले होते. या घटनेत शंभरहून अधिक वाहनांसह सुमारे ११० दुकानदारांचे लाखो रुपयांचे फटाके जळाले होते. याचा संदर्भ घेत पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी गतवर्षीपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागांत लागणा-या फटाका दुकानांच्या परवानगीचा निर्णय देण्यापूर्वी पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे आणि उपायुक्त विनायक ढाकणे यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. या दोन्ही अधिका-यांनी शुक्रवारी त्यांचा अहवाल पोलीस आयुक्तांना सादर केला. शुक्रवारी अयोध्या मैदान आणि वाळूज येथील फटाका मार्केटला ग्रीन सिग्नल दिला होता. सिडको-हडको, टीव्ही सेंटर, शिवाजीनगर, मुकुंदवाडी आणि चिकलठाणा, पुुंडलिकनगर रोडवरील फटाका दुकानांना सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शनिवारी रात्री स्पष्ट
केले.