अतुल सावे, जैस्वाल, थोरात यांच्या प्रचार कार्यालयांची परवानगी रद्द; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 01:49 PM2024-11-14T13:49:04+5:302024-11-14T13:50:20+5:30

या प्रकरणात सुहास वानखेडे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

Permission of campaign offices of Atul Save, Pradeep Jaiswal, Balasaheb Thorat canceled | अतुल सावे, जैस्वाल, थोरात यांच्या प्रचार कार्यालयांची परवानगी रद्द; कारण काय?

अतुल सावे, जैस्वाल, थोरात यांच्या प्रचार कार्यालयांची परवानगी रद्द; कारण काय?

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापलेले असतानाच निवडणुकीच्या मैदानात असलेल्या तीन उमेदवारांना आचारसंहितेची सीमा ओलांडल्यामुळे दणका बसला आहे. मध्य मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल, उद्धवसेनेचे बाळासाहेब थोरात आणि पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचार कार्यालयाची परवानगी सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द केली आहे.

मतदान केंद्रापासून २०० मीटरच्या आत सदरील उमेदवारांचे प्रचार कार्यालय थाटल्यामुळे आचारसंहितेची सीमा ओलांडली गेली, त्यामुळे उमेदवारांना आता नियमांत कार्यालय सुरू ठेवण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. या प्रकरणात सुहास वानखेडे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे देखील ऑनलाइन तक्रार केली होती. विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे प्रचार कार्यालय २०० मीटर अंतराच्या आतील मतदान केंद्रानजीक आहे.

या तक्रार व याचिकेच्या अनुषंगाने मध्य मतदारसंघ आणि पूर्व मतदारसंघ निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासले असता प्रचार कार्यालय मतदान केंद्राच्या २०० मीटर अंतराच्या आत असल्याच्या तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यानुसार प्रचार कार्यालयास दिलेली परवानगी रद्द करण्यात येत आहे.

उमेदवार सावे यांच्या एन-३ येथील प्रचार कार्यालयासमोर कम्युनिटी सेंटरमध्ये मतदान केंद्र आहे, तर उमेदवार जैस्वाल यांच्या समर्थनगर येथील कार्यालयासमोर एम.पी.लॉ. काॅलेजमध्ये मतदान केंद्र आहे, तर उमेदवार थोरात यांच्या प्रचार कार्यालयालगत शिशू विहार शाळेत मतदान केंद्र असल्याचे वानखेडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

प्रशासनाने दिलेली माहिती अशी
पूर्व मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे यांनी सांगितले, उमदेवार अतुल सावे यांच्या प्रचार कार्यालयास दिलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. त्याबाबत त्यांच्या कार्यालय प्रतिनिधीला कळविले आहे, तर मध्य मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकट राठोड यांनी सांगितले, उमेदवार प्रदीप जैस्वाल, बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयांना दिलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. याबाबत संबंधितांना कळविले आहे.

उमेदवार प्रतिनिधी काय म्हणतात...

कार्यालयाला प्रशासनानेच परवानगी दिली होती, त्यामुळे विद्यमान जागेत सुरू केले होते. आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
- उमेदवार सावे यांचे कार्यालय प्रतिनिधी

मतदान केंद्रापासून कार्यालय लांबवर आहे. २०० मीटर अंतरापासून दूर आहे. तरीही कार्यालयावरील बॅनर्स, बोर्ड झाकून टाकण्याची काळजी घेतली आहे.
- उमेदवार थोरात यांचे कार्यालय प्रतिनिधी

कार्यालयापासून मतदान केंद्र दूर आहे. तरीही प्रशासनाने केलेल्या सूचनेप्रमाणे बोर्ड, बॅनर्स झाकून टाकले आहेत. मतदान केंद्रापासून कार्यालय मागे घेऊ.
- उमेदवार जैस्वाल यांचे कार्यालय प्रतिनिधी

याचिकाकर्ते काय म्हणतात...
निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यामुळेच तक्रार व जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणात कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे.
- सुहास वानखेडे, याचिकाकर्ते

Web Title: Permission of campaign offices of Atul Save, Pradeep Jaiswal, Balasaheb Thorat canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.