‘सिद्धार्थ’च्या प्राणिसंग्रहालयाची परवानगी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 11:53 PM2018-12-01T23:53:19+5:302018-12-01T23:55:29+5:30
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने औरंगाबाद महापालिकेअंतर्गत सुरू असलेल्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाची परवानगी शुक्रवारी सायंकाळी रद्द केली. या कारवाईमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद : केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने औरंगाबाद महापालिकेअंतर्गत सुरू असलेल्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाची परवानगी शुक्रवारी सायंकाळी रद्द केली. या कारवाईमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईच्या विरोधात ३० दिवसांमध्ये अपिलात जाण्याची मुभा आहे. महापालिका प्रशासनाने अपिलाची जोरदार तयारी सुरू केली आहे. केंद्रीय प्राधिकरणाने २६ एप्रिल २०१८ रोजी महापालिकेला अंतिम नोटीस पाठवून परवानगी रद्द करण्याचा इशारा दिला होता.
सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय १९८३ मध्ये सुरू करण्यात आले. मराठवाड्यातील हे एकमेव प्राणिसंग्रहालय आहे. येथील गैरसोयी आणि अपुऱ्या जागेमुळे प्राणिसंग्रहालयाची परवानगी मागील काही दिवसांपासून संकटात सापडली होती. प्राणिसंग्रहालय कायमस्वरूपी का बंद करण्यात येऊ नये, अशी विचारणा केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २४ एप्रिल रोजी मनपाकडे केली होती. त्यानंतरही महापालिकेने कोणत्याच ठोस उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे प्राधिकरणाचे संचालक डी. एन. सिंग यांनी कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईच्या विरोधात ३० दिवसांमध्ये अपील दाखल करण्याची मुभा आहे. महापालिका नामुष्की टाळण्यासाठी अपिलात जाणार आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर अपिलाची फाईल तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
एक महिन्याची मुदत
२६ एप्रिल रोजी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मनपाला नोटीस बजावून प्राणिसंग्रहालयात सुधारणा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. २४ मे २०१८ पर्यंत अटी-शर्ती पूर्ण कराव्यात, असेही नोटीसमध्ये नमूद केले होते. प्राधिकरणाच्या निकषानुसार प्राणिसंग्रहालयात एकही बाब समाधानकारक नाही. सर्व निकष धाब्यावर बसवून प्राण्यांना ठेवण्यात आले आहे. चार वर्षांपूर्वीही केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने महापालिकेला अशा आशयाची नोटीस बजावली होती. नोटीसमध्ये तब्बल ३५ आक्षेप नोंदविले होते.
३० कोटींचा आराखडा कागदावर
महापालिकेने ३० कोटी रुपये खर्च करून प्राणिसंग्रहालयात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यात येतील म्हणून आराखडाही तयार केला. हा आराखडा कागदावरच आहे. आराखड्यात प्राधिकरणाच्या नियमानुसार सर्व निकष पाळण्यात येतील. प्राण्यांसाठी मोठी जागा करण्यात येईल, असे आराखड्यात नमूद केले होते.
पूर्वग्रहदूषित कारवाई
नोटीस मिळताच मनपाने मिनी ट्रेन बंद केली. सात पिंजºयांची दुरुस्ती सुरू आहे. आराखड्यानुसार प्राणिसंग्रहालयात कामे सुरू आहेत. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे संचालक डी. एन. सिंग निवृत्त होत आहेत. निवृत्तीपूर्वी त्यांनी पूर्वग्रहदूषित कारवाई केल्याचा आरोप महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला. मनपा अपिलात जाऊन परत परवानगी मिळविणार आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. प्राणिसंग्रहालय सुरू राहणार आहे.
प्राधिकरणाचे प्रमुख आक्षेप
प्राणिसंग्रहालयासाठी नेमकी सीमारेषा निश्चित केलेली नाही.
उद्यानातील मिनी ट्रेनच्या कर्कश आवाजामुळे प्राण्यांना त्रास होतो.
प्राणिसंग्रहालयाच्या वाढीव जागेवर ट्रॅफिक गार्डन कसे काय उभारले.
प्राधिकरणाची परवानगी न घेता लांडगा हा प्राणी कसा काय आणला.
सफारी पार्कच्या अंमलबजावणीसाठी नियोजित कालबद्ध कार्यक्रमच नाही.
प्राणिसंग्रहालयात प्राण्यांसाठी स्वतंत्र पाण्याची टाकी नाही.
प्राण्यांसाठी खूपच छोट्या स्वरुपाचे पिंजरे बांधले आहेत.