परीक्षा पास झाल्यानंतरच मिळणार वडापाव विकण्याला परवानगी !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 07:49 PM2024-09-24T19:49:54+5:302024-09-24T19:50:09+5:30
ऑनलाईन परीक्षा पास झाल्यानंतरच वडापाव विकण्याला परवानगी मिळणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यात प्रत्येक जिल्ह्यात विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा घेतली जात आहे. आपल्या जिल्ह्यात ही मोहीम राबविणे सुरू असून, चार तास प्रशिक्षण घेतल्यावर खाद्यपदार्थांविषयी घ्यावयाची काळजी आणि खबरदारीची भूमिका हा महत्त्वाचा विषय आहे. ऑनलाईन परीक्षा पास झाल्यानंतरच वडापाव विकण्याला परवानगी मिळणार आहे.
काय आहे मोहीम?
सध्या वडापाव हा खाद्यपदार्थ सध्या जलद गतीने व सोयीस्कर मिळणारा नाष्टा असल्याने त्यात काही आरोग्यावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून खबरदारी घेत योग्य प्रशिक्षणाची ही मोहीम राबविणे सुरू आहे.
आधी प्रशिक्षण, नंतर परीक्षा
शहरात खाजगी संस्थेकडे प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. परंतु खाद्यपदार्थ विक्री करताना त्याची गुणवत्ता जपणे निर्भेळ वस्तू ग्राहकांना दिले जावे म्हणून प्रशिक्षण आणि परीक्षा असा नियमच केला आहे.
कोणाला ही परीक्षा द्यावी लागणार?
खाद्यपदार्थ बनविण्यासाठी प्रशिक्षण परवाना असणे गरजेचे आहे. त्याशिवाय परवानाच तुम्हाला मिळणे शक्य नाही. जिल्ह्यात व शहरात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे.
जिल्ह्यात कधी ?
खाजगी संस्थेकडे ही योजना राबविली असून, त्यानुसार ही फ्री आणि ऑनलाईन परीक्षा तुम्ही पास झाला तरच परवाना दिला जाणार आहे. आपल्या जिल्ह्यात ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.
गुणवत्ता राखण्याचा उद्देश..
तुम्ही सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्वक पदार्थ उपलब्ध करून दिलेच पाहिजे. त्यात दिलेले नियम व अटी पाळणे खूप गरजेचे आहे. कुणालाही त्रास होता कामा नये. गुणवत्ता राखण्याचा उद्देश आहे.
- निखिल कुलकर्णी, निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन.