९ जणांचा बळी घेणाऱ्या 'त्या' अपघाताला टँकरमधील अर्धे पाणी कारणीभूत; आरटीओने दिला अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 07:54 PM2018-05-17T19:54:14+5:302018-05-17T19:55:19+5:30
औरंगाबाद-पैठण रोडवर पाण्याच्या टँकरने रिक्षाला फरपटत नेत ९ जणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना ११ मे रोजी घडली. अपघाताच्या वेळी टँकरमध्ये अर्धेच पाणी भरलेले होते. यामुळे पाणी पुढे आणि मागे होऊन उसळत असल्यानेच अपघाताला आमंत्रण मिळाल्याचा अहवाल आरटीओ कार्यालयाने दिला आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद-पैठण रोडवर पाण्याच्या टँकरने रिक्षाला फरपटत नेत ९ जणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना ११ मे रोजी घडली.अपघाताच्या वेळी टँकरमध्ये अर्धेच पाणी भरलेले होते. यामुळे पाणी पुढे आणि मागे होऊन उसळत असल्यानेच अपघाताला आमंत्रण मिळाल्याचा अहवाल आरटीओ कार्यालयाने दिला आहे.
बिडकीनकडून पाण्याचा खाजगी टँकर (क्रमांक एमएच-१५जी ८४०) ११ मे रोजी नक्षत्रवाडीकडे येत होता. गेवराई तांडा येथील एका ढाब्याजवळ बिडकीनकडून आलेला एक सुसाट दुचाकीस्वार हा औरंगाबादकडे जाण्यासाठी टँकरला ओव्हरटेक करण्यासाठी पुढे आला.
डाव्या बाजूने अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी टँकरचालकाने वेगातील टँकर उजव्या बाजूच्या रस्त्यावर घेतला. त्याचवेळी समोरून रिक्षा येत होती.
टँकरचालकाने ब्रेक न लावता रिक्षाला जोराची धडक दिली. यावेळी टँकरने रिक्षाला सुमारे पन्नास फुटांपर्यंत फरपटत नेले. हा अपघात एवढा भीषण होता की, रिक्षातील प्रवासी खाली पडून टँकरखाली चिरडले गेले. या घटनेची आरटीओ कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली. यामध्ये टँकरमध्ये अर्धवट पाणी भरल्याने अपघात घडल्याचे समोर आले आहे.
टँकर पूर्ण रिकामे करावे
टँकरमध्ये अर्धे पाणी भरलेले होते. यामुळे पाणी उसळून अपघाताला आमंत्रण मिळाले. यासंदर्भात पोलीस आणि परिवहन विभागाला अहवाल देण्यात आला आहे. टँकरमध्ये अर्धे पाणी असेल तर सहजपणे ब्रेक लागत नाही. हे अतिशय चुकीचे आहे. टँकर पूर्ण रिकामे केल्यानंतरच चालविले पाहिजे. अशा प्रकारे अर्र्धे पाणी भरणाऱ्या टँकरवर आरटीओ कार्यालयातर्फे कारवाई केली जाईल, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी दिली.