‘पेट’ची तारीख जाहीर; दोन दिवस होणार परीक्षा
By Admin | Published: July 1, 2017 12:48 AM2017-07-01T00:48:05+5:302017-07-01T00:49:29+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अनियंत्रित कारभाराचा नमुना ठरलेली ‘पेट-४’ परीक्षेची तारीख अखेर ठरविण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अनियंत्रित कारभाराचा नमुना ठरलेली ‘पेट-४’ परीक्षेची तारीख अखेर ठरविण्यात आली आहे. ही परीक्षा १४ व १५ जुलै रोजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २० परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.
विद्यापीठाची पेट परीक्षा घेण्याचे भिजत घोंगडे अनेक दिवसांपासून पडले आहे. महिनाभरापूर्वी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पत्रकार परिषद घेत २ जुलै रोजी पेट-४ परीक्षा घेण्याची घोषणा केली. मात्र, यासाठी कोणतीही तयारी करण्यात आलेली नसल्याचे उघडकीस आले होते. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे हे पेटविषयी माहिती सांगण्यासही नकार देत होते.
चार अधिष्ठातांच्या हातात पेटचा कारभार देण्यात आल्यानंतर अर्जांची छाननी, प्रश्नपत्रिकांची तयारी करण्यात आली, तरीही घोषित केलेल्या तारखेला पेट परीक्षा घेण्यात अपयश आले. याविषयी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन करण्याची घोषणा केल्यामुळे पुन्हा एकदा पेटची तारीख घोषित करण्यात आली आहे. या घोषणेनुसार १४ व १५ जुलै रोजी पेट परीक्षा औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद येथील २० केंद्रांवर तीन सत्रांत होणार आहे. यात उद्या, शनिवारी पात्र, अपात्र विद्यार्थ्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
यावर अक्षेपासाठी ४ जुलैपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर ६ ते १० जुलैपर्यंत परीक्षार्थींना मेलवर परीक्षेचे हॉलतिकीट पाठविण्यात येणार आहेत. काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानंतर त्या सोडविण्यासाठी विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागात केंद्र उघडण्यात आले आहे.