विरोधकांच्या इशाऱ्याने 'लाडकी बहीण' विरोधात याचिका, पण आम्ही कोर्टातही जिंकू: मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 08:13 PM2024-08-02T20:13:31+5:302024-08-02T20:14:48+5:30
''रक्षाबंधनापूर्वी खात्यावर ३ हजार रुपये टाकणार''; लाडक्या बहिणींसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नतमस्तक
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: माझी लाडकी बहीण योजनेसाठी ४५ हजार कोटी रुपयांची व लाडका भाऊ योजनेसाठी १० हजार कोटीं रुपयांची सरकारने तरतूद केली आहे. मात्र विरोधकांच्या पोटात दुखत आहे, त्यांनी कोणाला तरी सांगून न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र,आम्ही कोर्टात ही जिंकू व ही योजना कायमस्वरूपी माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत सुरू ठेऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सर्व जातीपातीच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत खोडा घालणाऱ्या विरोधकांवर तुम्ही लक्ष ठेवा असे सांगून त्यांनी विरोधकावर तोफ डागली.
महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिल्लोड येथे आले होते. त्यांचा चिकालढाणा विमानतळा पासून ते सिल्लोड पर्यंत ठीक ठिकाणी सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी आलेल्या महिलाचा जनसागर बघून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व महिलां समोर स्टेजवर नतमस्तक झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजना आणून क्रांतिकारक निर्णय घेतला आहे,असे पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
रक्षाबंधनपूर्वी पैसे खात्यात
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५ लाख ४० हजार महिलांनी माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत ऑनलाइन व ऑफ लाईन अर्ज दाखल केले आहे. त्यापैकी त्रुटी नसलेले दोन लाख अर्ज यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर झाल्याची घोषणा केली. तसेच रक्षाबंधन पूर्वी त्या महिलांच्या खात्यावर दोन हप्त्यांचे ३ हजार रुपये जमा केले जातील,असेही मुख्यमंत्री म्हणाले.
खोट्या प्रचाराला बळी पडू नका
आम्ही राज्य समृद्ध करणार,दुष्काळाची ओळख पुसणार,नदी जोड प्रकल्प राबवणार,पाणी टंचाई साठी वाटत ग्रीड योजना राबवित आहे.संभाजी नगर मध्ये आम्ही उद्योग आणले त्यातून अनेक बेरोजगारांना रोजगार मिळेल मात्र विरोधक चिडले आहे संपवण्याची भाषा करत आहे.मात्र या राज्यात जनता हुशार आहे अशा लोकांना जनता सहन करणार नाही विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका असे ही शिंदे म्हणाले.