जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीला आव्हान देणारी याचिका फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:04 AM2021-05-08T04:04:36+5:302021-05-08T04:04:36+5:30
जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक ३ जानेवारी २०२० ला जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखालील सभेत झाली होती. महिला राखीव अध्यक्षपदासाठी मीना रामराव ...
जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक ३ जानेवारी २०२० ला जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखालील सभेत झाली होती. महिला राखीव अध्यक्षपदासाठी मीना रामराव शेळके, देवयानी डोणगावकर आणि अनुराधा चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या सभेत मतमोजणी करत असताना मोनाली राठोड यांनी नोंदवलेले मत चुकीचे नोंदविल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावर पीठासीन अधिकाऱ्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक तहकूब करून ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच ४ जानेवारीला ठेवली.
पीठासीन अधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी हा निर्णय घेतला, असा आक्षेप घेत देवयानी डोणगावकर यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या सभा तहकूब करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते. यावर ४ जानेवारीला खंडपीठाने तहकूब सभा चालू ठेवावी; परंतु अध्यक्ष निवडीचा निर्णय हा न्यायालयीन निकालाच्या अधीन राहील, असा निर्णय देत सुनावणी पुढे ढकलली होती. यावर पीठासीन अधिकाऱ्यांनी ४ जानेवारीला तहकूब सभा नव्याने सुरुवात करीत अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पाडली. यात देवयानी डोणगावकर आणि मीना शेळके यांना समान मते मिळाल्यामुळे चिठ्ठी टाकून शेळके यांना अध्यक्ष म्हणून घोषित केले. मीना शेळके यांच्या निवडीलासुद्धा खंडपीठात आव्हान देण्यात आले होते.
उभय पक्षाचा युक्तिवाद ऐकून खंडपीठाने असा निर्णय दिला की, एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला असता पीठासीन अधिकाऱ्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. त्यामुळे ४ जानेवारी २०२० च्या सभेत झालेला निर्णय हा योग्य व अंतिम ठरविण्यात आला. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी काम पाहिले, शासनातर्फे अॅड. ज्ञानेश्वर काळे तर मीना शेळके यांच्यातर्फे अॅड. वसंतराव साळुंके यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. मयूर साळुंके यांनी सहकार्य केले.