लसवंतांनाच द्या पेट्रोल, गॅस, रेशनचे धान्य; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 12:48 PM2021-11-10T12:48:59+5:302021-11-10T12:53:14+5:30
corona vaccine: औरंगाबाद जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण केवळ ५५ टक्के आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला मिळणारा अल्प प्रतिसाद, तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने कोरोना लस घेतलेल्या नागरिकांनाच पेट्रोल, गॅस, रेशनचे धान्य द्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी रात्री जारी केले. तसेच जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर येणारे पर्यटक, अभ्यागतांनी लसीकरणाची किमान १ मात्रा घेतली नसेल तर त्यांना पर्यटनस्थळात प्रवेश दिला जाणार नाही.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आदेशाच्या अंमलबजावणीच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण केवळ ५५ टक्के आहे. हे प्रमाण राज्याच्या टक्केवारीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. राज्यात लसीकरणामध्ये औरंगाबाद जिल्हा २६ व्या क्रमांकावर आहे. शासनाने संपूर्ण राज्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनचे निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी केलेले असून, संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेता, जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे अपेक्षित आहे.
लस नाही तर वेतनही नाही
जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक आहे. किमान एक डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सर्व शासकीय कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना दाखविले तरच नोव्हेंबर महिन्याचे वेतन अदा केले जाईल, असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोषागार विभागास दिले आहेत.
कृउबा समिती, पेट्रोलपंपावर काय करावे
शेतकऱ्याचा माल घेण्यात यावा. लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कृषी मालाचे पैसे अदा करण्यापूर्वी लस प्रमाणपत्र असल्याची खात्री करावी. तसेच पेट्रोल पंपावर बाहेरील जिल्ह्यातील व्यक्तींची यादी करून लसीकरण प्रमाणपत्र आहे का विचारावे. प्रमाणपत्र नसल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी त्यांना पाठवावे. सर्व पेट्रोल पंपधारक, सर्व गॅस एजन्सीधारक, सर्व रेशन दुकानदार, कृषि उत्पन्न बाजार समित्यांसाठी आदेश बंधनकारक करण्यात आले आहेत.
तरच पर्यटनस्थळांत मिळेल प्रवेश
बिबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, अजिंठा लेणी, वेरुळ लेणी, दौलताबाद किल्ला आणि पितळखोरा लेणी पर्यटनस्थळात लस न घेतलेल्या नागरिकांना प्रवेश मिळणार नाही. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा किमान एक डोस घेणाऱ्यांना पर्यटनस्थळात प्रवेश मिळणे शक्य होईल.