पेट्रोलमध्ये निघाले पुन्हा पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:18 AM2018-04-01T00:18:20+5:302018-04-01T00:19:43+5:30
शहरातील पेट्रोलपंपांतील इंधनामध्ये पाणी निघण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. बाबा पेट्रोलपंपावर असाच प्रकार शनिवारी (दि.३१) घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील पेट्रोलपंपांतील इंधनामध्ये पाणी निघण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. बाबा पेट्रोलपंपावर असाच प्रकार शनिवारी (दि.३१) घडला. गाडीत टाकलेल्या इंधनामध्ये पाणी निघाल्यानंतर ग्राहकाने क्रांतीचौक पोलीस ठाणे, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि वजन - काटे निरीक्षकांकडे तक्रार देत पेट्रोलपंप चालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकारामुळे पुन्हा एकदा पेट्रोलपंप संशयाच्या भोवºयात सापडले आहेत.
तीन महिन्यांपूर्वी उस्मानपुºयातील युनिक आॅटो पेट्रोलपंपावर इंधन भरताना पाणीमिश्रित इंधन मिळाल्याची तक्रार युवकांनी केली होती. यानंतर काही दिवस जाताच पेट्रोलपंपावर मापात पाप केल्याचे प्रकार उघडकीस आले. यामुळे एका पेट्रोलपंपाला टाळेही ठोकण्यात आले होते, तरीही पुरवठा, वजन-काटे विभागाने याबाबत कडक कारवाई केली नाही. यामुळे पाणीमिश्रित इंधन मिळण्याचे प्रकार घडत आहेत. नीलेश आंबेवाडीकर, अमोल निराटे यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बाबा पेट्रोलपंप येथे दुचाकी गाडीत (एम.एच. २०/७६०९) शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास २०० रुपयांचे पेट्रोल इंधन टाकले. तेथून काही अंतरावर गाडी घेऊन गेल्यानंतर गाडी बंद पडली. पुन्हा सुरू होण्यासही त्रास झाला. यानंतरही गाडी दोन वेळा बंद पडली. त्यामुळे गॅरेजच्या कर्मचाºयाला बोलावून घेतले. तेव्हा पाणीमिश्रित इंधन असल्याचा संशय आला. गाडीच्या टाकीतून संपूर्ण इंधन बाहेर काढले असता, त्यात पाणी आढळून आले. याचा जाब बाबा पेट्रोलपंपावर विचारण्यात आला, तर उलट पंपावरील कर्मचाºयांनी आमच्याशीच हुज्जत घातली. अशी जनतेची फसवणूक करणा-या पेट्रोलपंप चालकांविरोधात गुन्हा दाखल करावा, असेही तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय नीलेश अंबेवाडीकर यांच्यासह इतरांनी वजन-काटे निरीक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडेही पेट्रोलपंपावर कारवाई करण्यासाठी तक्रार नोंदवली आहे.
पाणीमिश्रित इंधनाचे जुनेच तुणतुणे कायम
ज्यांनी पाणीमिश्रित इंधन गाडीत सापडले असा आरोप केला आहे. त्यांच्या गाडीच्या टाकीत मॉइश्चर जमा झालेले असतील. सध्या इथेनॉलमिश्रित इंधन येते. या मॉइश्चरमुळे पेट्रोल आणि इथेनॉल वेगळे होतात. यामुळे पाणी आढळले असेल. तसेच गाडी सर्व्हिसला टाकल्यानंतर पाणी पेट्रोल टाकीत जाऊ शकते. याचा दोष हा संबंधित गाडीवाल्याचा आहे, असे सांगत औरंगाबाद पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी पाणीमिश्रित इंधनासंदर्भात आपले जुनेच तुणतुणे कायम ठेवले.