औरंगाबादेत पेट्रोलचे भाव ८५ पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:02 AM2018-05-21T00:02:53+5:302018-05-21T00:05:30+5:30
पेट्रोलच्या कि मतीने प्रतिलिटर ८५ रुपयांचा भाव पार केला आहे. डिझेलही ७३ रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. यामुळे पुन्हा महागाई बोकळणार आहे. ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेत सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पेट्रोलच्या कि मतीने प्रतिलिटर ८५ रुपयांचा भाव पार केला आहे. डिझेलही ७३ रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. यामुळे पुन्हा महागाई बोकळणार आहे. ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेत सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या चार आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर होत असल्याचे कारण इंधन कंपन्या देत आहेत. मात्र, देशात पेट्रोल-डिझेलवर एवढे कर लादण्यात आले असून, त्याचा मोठा फटका येथील नागरिकांना बसत आहे. पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीमध्ये करण्यात यावा, अशी मागणी पेट्रोल डीलर्स असोसिएशनने केली आहे, पण अजूनही याविषयी जीएसटी समितीला निर्णय घेता आला नाही. रविवारी २० रोजी शहरात जेव्हा वाहनधारक पेट्रोलपंपावर गेले व किमतीचे फलक बघून प्रत्येकाचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. कारण पेट्रोल ८५ रुपये ३८ पैसे, तर डिझेल ७३ रुपये २0 पैसे प्रतिलिटर विक्री होत होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी १ एप्रिल २०१८ रोजी पेट्रोल ८२ रुपये ६६ पैसे तर डिझेल ६९ रुपये ८७ पैसे प्रतिलिटरपर्यंत जाऊन पोहोचले होते. मात्र, ५० दिवसांत पेट्रोल २ रुपये ७२ पैसे तर डिझेल ३ रुपये ३३ पैशांनी महागले. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ही सर्वोच्च भाववाढ ठरली आहे. या भाववाढीने दुचाकी वाहनचालकांचे महिन्याचे बजेट बिघडले आहे. तर डिझेलमधील भाववाढीच्या भडक्याने मालवाहतुकीचे दर आणखी वाढतील व अंतिमत: नव्याने महागाई बोकळणार आहे. आणखी काही दिवस तरी भाववाढ होत राहील, अशी प्रतिक्रिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
चक्का जामशिवाय नाही पर्याय
१ एप्रिल २०१८ रोजी डिझेलचे भाव वाढले होते. त्यानंतर मालवाहतुकीच्या भाड्यात १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. आता ५० दिवसांत ३.३३ रुपयांनी डिझेल महागले आहे. यामुळे गाडीभाडे वाढवावे लागणार आहे. एकीकडे भाववाढ होत असताना दुसरीकडे कंपन्यांच्या करारानुसार पूर्वीच्याच दरात मालवाहतूक करावी लागत आहे. याचा मोठा फटका मालवाहतूकदारांना बसत असून, आता देशभरात चक्का जाम आंदोलनाशिवाय पर्याय नाही. यासंदर्भात दिल्ली व मुंबई संघटनेत विचारमंथन सुरू आहे.
फैय्याज खान
अध्यक्ष, मालवाहतूकदार संघटना.