पेट्रोलपंप चालणार एकाच शिफ्टमध्ये
By Admin | Published: May 11, 2017 11:40 PM2017-05-11T23:40:53+5:302017-05-11T23:43:07+5:30
लातूर : पेट्रोल, डिझेलचे कमिशन वाढवून मिळावे, या मागणीसाठी १४ मे पासून पेट्रोलपंप एकाच शिफ्टमध्ये चालविण्याचा निर्णय लातूर जिल्हा पेट्रोल व डिझेल डिलर्स असोसिएशनने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : पेट्रोल, डिझेलचे कमिशन वाढवून मिळावे, या मागणीसाठी १४ मे पासून पेट्रोलपंप एकाच शिफ्टमध्ये चालविण्याचा निर्णय लातूर जिल्हा पेट्रोल व डिझेल डिलर्स असोसिएशनने घेतला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनही देण्यात आले आहे. १५ मे पासून सकाळी ९ ते सायंकाळी ६ याच वेळेत पेट्रोलपंप सुरू राहणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांना सायंकाळनंतर पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही.
२०११ मध्ये अपूर्वा चंद्रा कमिटीद्वारे केंद्र शासनाने तेल कंपन्यांना पंप चालविण्यासाठी आवश्यक खर्च किती असावा, त्यास दर सहा महिन्यांनी महागाई निर्देशांकानुसार वाढ देण्याचे लेखी आदेश दिले आहेत, असे असतानाही गेल्या चार वर्षांपासून तेल कंपन्यांनी त्याचे पालन केले नाही. त्यामुळे पंप चालकांना मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे लातूर जिल्हा पेट्रोल व डिझेल डिलर्स असोसिएशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही तेल कंपन्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने नोव्हेंबर २०१६ मध्ये देशपातळीवर आंदोलन केले होते. या आंदोलनातून तेल कंपन्यांनी ४ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र शासनाच्या अपूर्वा चंद्रा कमिटीच्या निर्देशानुसार पंप चालविण्यासाठी खर्चाचा परतावा १ जानेवारी २०१७ पासून देण्याबाबतचा लेखी करार तेल कंपन्यांनी फामपेडा या राज्य संघटनेसोबत केला होता. या करारातील तीन महिने संपूनही अद्याप तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून सदर कराराची अंमलबजावणी होत नसल्याने राज्य संघटनेने पंप चालविण्याचा खर्च कमी करण्यासाठी एका शिफ्टमध्ये पंप चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील सर्वच पेट्रोल पंपांवर एका शिफ्टमध्ये पेट्रोल व डिझेल मिळणार असून वाहनधारकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.