मौजमजेसाठी घेतलेल्या कर्जफेडीसाठी पेट्रोल चोरी; पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 03:51 PM2020-12-25T15:51:06+5:302020-12-25T16:06:27+5:30
गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉल मागील छत्रपती नगरातून दोघांना ताब्यात घेतले
औरंगाबाद: गारखेडा परिसरातील छत्रपती नगर येथे दुचाकी मधून पेट्रोल चोरी करताना दोन चोरट्यांना गस्तीवरील पुंडलिक नगर पोलिसांनी गुरुवारी रात्री ३:१५ वाजेच्या सुमारास रंगेहात पकडले. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
किरण रामभाऊ दापके (रा.कडा परिसर ) आणि कृष्णा अण्णासाहेब लष्करे (रा. शिवाजीनगर) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. गेल्या काही दिवसापासून पेट्रोलचे दर सतत वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पेट्रोल खरेदी करताना सतत झळ बसत आहे. अशातच चोरट्यांनी पेट्रोल चोरीचा नवीन धंदा केला. गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉल मागील छत्रपती नगरातून गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, हवालदार इमरान आतार आणि होमगार्ड शेख हे २४ रोजी रात्री ३:१५ वाजेच्या सुमारास जात होते. तेव्हा तेव्हा तेथे दोन जण अंधारात उभे असल्याचे पोलिसांना दिसले.
पोलिसांनी त्यांचे वाहन थांबताच आरोपी पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून अवघ्या काही अंतरावर दोन्ही संशयिताना पकडले. तेव्हा तेथील एका मोटारसायकलच्या इंधन टाकितील पेट्रोल ते चोरत असल्याचे दिसून आले. त्यांच्याजवळील प्लास्टिक कॅनमध्ये त्यांनी विविध वाहनातून चोरलेले दहा ते बारा लिटर पेट्रोल होते. याप्रकरणी पोलीस कॉंस्टेबल इमरान यांनी सरकारतर्फे पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरूध्द गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. पोलीस हवालदार एल बी हिंगे हे तपास करीत आहेत. आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल चोरी करीत असावेत असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
कर्ज फेडण्यासाठी पेट्रोल चोरी
दोन्ही आरोपी ९ वी आणि १२ वीपर्यंत शिकलेले आहेत. ते अधूनमधून मजूरी करतात. मात्र मौजमजा करण्यासाठी त्यांनी मित्रांकडून उसने पैसे घेतले आहेत. उसने पैशाची परतफेड करण्यासाठी पेट्रोल चोरी करुन ते विक्री करीत असल्याची कबुली त्यांनी दिली.