किरकोळ वाद अन् सोशल मीडियात अफवांचा बाजार; पोलिसांची दमछाक,समाज निघतोय ढवळून
By राम शिनगारे | Published: April 8, 2023 12:47 PM2023-04-08T12:47:06+5:302023-04-08T12:47:29+5:30
सोशल मीडियावरील माहितीची करा शहानिशा; चुकीची पोस्ट टाकल्यास होणार गुन्हा नोंद
छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपासून जुने वाद, किरकोळ भांडणाला सुद्धा धार्मिकतेचा मुलामा देऊन सोशल मीडियात अफवा पसरविण्यात येत आहेत. चुकीच्या आणि ऐकीव माहितीवरच्या पोस्टमुळे पोलिसांची पुरती दमछाक होत असल्याचे विविध घटनांवरून स्पष्ट झाले आहे. शहर पोलिसांनी चुकीची माहिती देणाऱ्या, बदनामीकारक पोस्ट, छायाचित्र टाकणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे नोंदविले. मात्र, हे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असून, त्यामुळे समाज ढवळून निघत आहेत. कोणत्याही माहितीची शहानिशा केल्याशिवाय पोस्ट फॉरवर्ड करू नये, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
सोशल मीडियात पसरविलेल्या अफवा
१) घाटी रुग्णालयामध्ये एका धार्मिक गुरूची विटंबना करण्यात आल्याचा मेसेज सोशल मीडियात दि. २६ मार्च रोजीच्या मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास व्हायरल झाला. जखमी धार्मिक गुरू हा जालना जिल्ह्यातील होता. मात्र, त्यासाठी मध्यरात्री घाटी रुग्णालयात जमाव आला. जमावाला शांत करताना पोलिसांची दमछाक झाली. पोलिसांनी वेळीच घटनेची शहानिशा केल्यामुळे अनर्थ टळला.
२) २९ मार्चच्या रात्री किराडपुऱ्यातील राममंदिराच्या प्रवेशद्वारासमोर दोन गटांत वादावादी झाली. हा वाद पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मिटला. त्यानंतर सोशल मीडियात चुकीचे मेसेज व्हायरल झाले, तोंडोतोंडी अफवांचे पीक आले. त्यातूनच एक मोठा जमाव पोलिसांवरच चाल करून आला. पोलिसांसह मंदिरावर दगडफेक करीत शासकीय वाहनांची जाळपोळ करण्यात आली. यात सोळा पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले.
३) पैठणगेट परिसरात १ एप्रिल रोजी एका दारुड्याने ११२वर फोन करून दोन गटांत आमनेसामने आले असून, दंगल होणार असल्याचे करण गाडेकर या कामगाराने सांगितले. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा करण गाडेकर हा दारू पिऊन पडलेला पोलिसांना आढळला.
४) ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे खासगी बसला आग लागली. त्या बसच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या बसनेही पेट घेतला. काही वेळातच बस जळतानाचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले. त्यातून पुन्हा छत्रपती संभाजीनगरात जाळपोळ झाल्याचा संदेश पसरला. ही सुद्धा अफवाच होती.
५ ) एप्रिलच्या मध्यरात्री भीमनगर, भावसिंगपुरा भागात किरकोळ वादातून दोन समाजांतील वाद असल्याची अफवा सोशल मीडियात व्हायरल झाली. मात्र, संबंधितांचे वाद हे जुनेच असल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले.
पोलिसांची धावपळ
दोन समाजांतील वाद असल्याची चुकीची माहिती आल्यानंतर पोलिस तत्काळ सजग होतात. सत्य माहिती समोर येईपर्यंत चुकीची माहिती सोशल मीडियातून फाॅरवर्ड होते. तेव्हा पोलिसांचीही स्पष्टीकरण देता देता धावपळ उडत असल्याचे विविध घटनांतून स्पष्ट झाले आहे.
माहिती पोलिस यंत्रणेला द्या
सोशल मीडियात समाजात तेढ निर्माण होईल, असा मजकूर, छायाचित्र टाकू नये. चुकीचे व्हिडीओ फाॅरवर्ड करू नका. कोणी करीत असेल तर त्याची माहिती पोलिस यंत्रणेला द्या. त्या व्यक्तींवर भारतीय दंड विधान संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात येईल. शहरातील शांततेसाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेत अफवा पसरविणाऱ्यांना रोखले पाहिजे. त्यांची नावेही पोलिसांना दिली पाहिजेत. त्यांच्यावर कडक कारवाई करता येईल.
- प्रविणा यादव, पोलिस निरीक्षक, शहर सायबर