‘पीएफआय’च्या राज्य अध्यक्षांना अटक, दोन ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी
By बापू सोळुंके | Published: September 23, 2022 07:00 PM2022-09-23T19:00:32+5:302022-09-23T19:02:00+5:30
एटीएसचे अधिकारी राज्य अध्यक्षांची चौकशी करीत होते. आज अखेर त्यास अटक करण्यात आली.
औरंगाबाद : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) महाराष्ट्र अध्यक्षांना दहशतवाद विरोधी पथकाने अटक करून शुक्रवारी दुपारी ‘एटीएस’च्या विशेष न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने या पाचव्या आरोपीला ९ दिवस, अर्थात २ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
शेख नासेर शेख साबेर ऊर्फ नदवी (३७, रा. बायजीपुरा) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. नदवी हे ‘पीएफआय’च्या महाराष्ट्र प्रमुख आहे. त्यांच्यासह शहरातील शेख इरफान शेख सलीम ऊर्फ मौलाना इरफान मिल्ली (वय ३७) सय्यद फैजल सय्यद खलील (२८), परवेज खान मजम्मील खान (२९) आणि जालन्यातील अब्दुल हादी अब्दुल रऊफ (३२, रा. रेहमान गंज, जालना) यांना ताब्यात घेतले होते. नदवी व्यतिरिक्त अन्य आरोपींना काल सकाळी अटक केली होती. नदवीची मात्र एटीएसचे अधिकारी चौकशी करीत होते. आज अखेर त्यास अटक करून ‘एटीएस’चे पोलीस उपअधीक्षक सुनील तांबे यांनी न्यायालयात हजर केले.
यावेळी सरकारी वकील विनोद कोटेचा यांनी आरोपींविरोधातही देशविरोधी कट रचल्याचा आरोप आहे. शिवाय त्यांना ‘टेरर फंडिंग’ मिळाली का, याचा तपास करण्यासाठी बँक खात्याची माहिती घेणे, त्याचा देशातील देशाबाहेर कोणासोबत संपर्क आला होता, का याविषयी तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. काल अटक केलेल्या संशयितांना १० दिवस, अर्थात २ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या आरोपींसोबतच नदवीला न्यायालयात हजर करता यावे, यासाठी त्यालाही न्यायालयाने त्यास २ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.