फार्मसी, आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या दारू ढोसून चोऱ्या; आई-वडिलांनीच नेले पोलिसांसमोर
By सुमित डोळे | Published: August 12, 2023 12:07 PM2023-08-12T12:07:55+5:302023-08-12T13:48:58+5:30
कॅनॉट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खर्डे यांच्या रेणुका ॲण्ड मल्टिसर्व्हिसेस मोबाइल शॉपी ३० जुलै रोजी पहाटे चोरांनी फोडले.
छत्रपती संभाजीनगर : पॉकेटमनीच्या पैशांतून दोन जिवलग मित्रांनी यथेच्छ दारू रिचवली. त्यानंतर कुटुंबाने घेऊन दिलेल्या स्पोर्ट्स बाइकवरून जालन्याहून शहरात आले व नशेत माेबाइल दुकानही फोडले. वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांवर घटनेचे वृत्त सीसीटीव्ही फुटेज झळकले. सुशिक्षित कुटुंबातील मुलांच्या पालकांपर्यंत ते पोहोचले आणि आपल्याच मुलांचे चोर म्हणून छायाचित्र पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर कॅनॉट प्लेसमधील मोबाइल शॉपीच्या चोरीत अभिषेक राजू रिढे (२१) व आदित्य अनिल उघडे (१९, दोघेही रा. इंदेवाडी, जालना) हे चोर असल्याचे निष्पन्न झाले. पालकांनी स्वत:हून सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांच्याशी संपर्क साधून मुलांना त्यांच्यासमोर हजर केले.
कॅनॉट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खर्डे यांच्या रेणुका ॲण्ड मल्टिसर्व्हिसेस मोबाइल शॉपी ३० जुलै रोजी पहाटे चोरांनी फोडले. ४० हजार रुपये रोख, १० स्मार्ट वॉचेस, १० एअरबड्स, १० की पॅड आणि ५ मोबाइल चार्जर असा हजारोंचा ऐवज नेला. सिडको ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, अंमलदार भाऊसाहेब जगताप यांनी याचा तपास सुरू केला. अर्धा तास दुकानात थांबून त्यांनी मोजका ऐवज चोरून पोबारा केला होता. घायाळ, जगताप यांनी आसपासच्या सर्व पोलिसांना फुटेज पाठवले होते.
छत्रपती संभाजीनगर: फार्मसी, आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या दारू ढोसून चोऱ्या; व्हिडिओ व्हायरल आई-वडिलांनीच नेले पोलिसांसमोर pic.twitter.com/YZel1imBTH
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) August 12, 2023
रेकॉर्डवरील एकाही गुन्हेगारांशी ते जुळत नव्हते. वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांवरही ते झळकले व इंदेवाडीपर्यंत पोहोचले. आपल्याच परिसरातील आदित्य व अभिषेकच हे चोर असल्याची चर्चा सुरू झाली. ६ ऑगस्ट रोजी दोघांच्या पालकांपर्यंत ही चर्चा पोहोचल्यानंतर त्यांना धक्काच बसला. विश्वासात घेतल्यानंतर दोन्ही मुलांनी चोरी मान्य केली. त्यानंतर पालकांनी त्यांना गिरी यांच्या समोर हजर केले. जालन्याच्या फार्मसी, आयटीआयचे हे विद्यार्थी आहेत.