पीएच.डी. प्रवेश नोंदणीला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:04 AM2021-06-30T04:04:57+5:302021-06-30T04:04:57+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. ऑनलाईन प्रवेश नोंदणीसाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी सायंकाळी जाहीर ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. ऑनलाईन प्रवेश नोंदणीसाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी सायंकाळी जाहीर केला.
विद्यापीठाने अगोदर ७ ते ३० जूनपर्यंत पीएच.डी.साठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानंतर ५ जुलैपर्यंत विद्यापीठात प्रत्यक्ष ‘हार्ड कॉपी’ जमा करावी लागणार होती. तथापि, लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थी गावी असून ग्रामीण भागात नेटवर्कच्या अडचणी येत असल्यामुळे ते पीएच.डी.साठी ऑनलाईन प्रवेश करू शकले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने ऑनलाईन प्रवेश नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यार्थी सेनेचे तुकाराम सराफ व सम्यक विद्यार्थी आंदोलनचे प्रकाश इंगळे यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी केली होती. या मागणीचा विचार करुन विद्यापीठाने मंगळवारी ऑनलाईन नोंदणीची मुदत १५ जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला, तर या विद्यार्थ्यांना २० जुलैपर्यंत विद्यापीठात हार्ड कॉपी जमा करावी लागणार आहे.
‘यूजीसी’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) आयोजित करण्यापूर्वी मार्गदर्शक व त्यांच्याकडे विषयनिहाय रिक्त जागांची यादी जाहीर करणे गरजेचे होते; परंतु विद्यापीठाने यादी जाहीर न करताच ‘पेट’चे आयोजन केले. पेटचा पहिला पेपर ३० जानेवारी रोजी झाला व १ फेब्रुवारी रोजी निकाल घोषित करण्यात आला. त्यानंतर दुसरा पेपर १३ मार्च रोजी घेण्यात आला व १७ मार्च रोजी निकाल जाहीर करण्यात आला. तेव्हापासून केवळ यादी जाहीर करण्याअभावी पीएच.डी. प्रवेशाची ही प्रक्रिया रखडली होती. अखेर ६ जूनरोजी विद्यापीठाने मार्गदर्शक, त्यांच्याकडील संशोधकांच्या रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात आली व ७ जूनपासून ऑनलाईन प्रवेश नोंदणीसाठी लिंक खुली करण्यात आली होती.