पीएचडी गाईडला अडीच लाख वेतन तरी संशोधकास शिष्यवृत्तीमधील मागितली १० हजारांची लाच

By राम शिनगारे | Published: August 20, 2024 12:17 PM2024-08-20T12:17:08+5:302024-08-20T12:17:41+5:30

ग्रंथपालाचा कारनामा, ५० हजार रुपयांची लाच घेताना मुलगा एसीबीच्या जाळ्यात अडकला

PhD guide have 2.6 lakhs salary, but taking bribe of 10,000 in researchers scholarship | पीएचडी गाईडला अडीच लाख वेतन तरी संशोधकास शिष्यवृत्तीमधील मागितली १० हजारांची लाच

पीएचडी गाईडला अडीच लाख वेतन तरी संशोधकास शिष्यवृत्तीमधील मागितली १० हजारांची लाच

छत्रपती संभाजीनगर : प्रतिमहिना २ लाख ६७ हजार ५८८ रुपये एवढे वेतन घेणाऱ्या डॉ. रफिक झकेरिया महिला महाविद्यालयाच्या ग्रंथपालाने पीएच.डी.चे संशोधक विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीमधील प्रतिमहिना १० हजार रुपये लाचेची मागणी केली. चार वर्षांचे मिळून ५ लाख रुपयांमध्ये तिच्या मुलाने व्यवहार ठरवला. त्यातील ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना ग्रंथपालाच्या मुलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी ग्रंथापालासह तिच्या दोन मुलांसह ग्रंथालय परिचारकाच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

आरोपींमध्ये ग्रंथपाल डॉ. एराज सिद्दीकी, ग्रंथालय परिचारक शेख उमर शेख गणी, ग्रंथपालाची मुले डॉ. सिद्दीकी मो. फैसोद्दीन उर्फ समीर मो. रियाजोद्दीन आणि सिद्दीकी फराज मो. रियाजोद्दीन यांचा समावेश आहे. तक्रारदार संशोधक विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयात पीएच.डी.चे संशोधन करीत आहे. त्यांना ग्रंथपाल डॉ. सिद्दीकी पीएच.डी.साठी मार्गदर्शन करतात. संशोधकास महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (महाज्योती) संशोधनास दरमहा ५० हजार ४०० रुपये शिष्यवृत्ती मिळते.

या संशोधकाचे प्रगती अहवाल, स्वयंघोषणा पत्र, हजेरी पत्रक, एचआरए प्रमाणपत्र, तिमाही, सहामाही प्रगती अहवालावर सही करण्यासाठी गाइडने प्रतिमहिना १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तेव्हाच, महाविद्यालयातील ग्रंथालय परिचारक शेख उमर याने डॉ. सिद्दीकी यांच्या सही करून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच संशोधकास मागितली. त्यानंतर २७ जुलै रोजी ग्रंथपालाने स्वत:चा वकील मुलगा डॉ. सिद्दीकी उर्फ समीर यास भेटण्याची सूचना तक्रारदार संशोधकास केली. त्यानुसार संशोधक डॉ. सिद्दीकी यास भेटला, तेव्हा त्याने शिष्यवृत्तीचे नोव्हेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२६ या चार वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिमहिना १० हजार रुपये प्रमाणे ५ लाख रुपयांची मागणी केली. त्यातील ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्यास होकार दर्शविला.

या प्रकाराची तक्रार जालना एसीबीच्या पथकाकडे संशोधकाने केली. त्यानुसार संशोधकाने सोमवारी (दि. १९) लाचेचा ठरलेला ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्याविषयी ग्रंथपालास विचारणा केली. तेव्हा तिने दुसरा मुलगा सिद्दीकी फराज याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने ५० हजारांची लाच घेताना सिद्दीकी फराज यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शंकर मुटेकर यांच्या पथकाने केली.

मुख्य आरोपी फरार, तिघे ताब्यात
एसीबीने ग्रंथपालाच्या मुलाच्या कार्यालयात छापा मारल्यानंतर तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. एसीबीचे पथक ग्रंथापालास ताब्यात घेण्यासाठी साडेतीन वाजेच्या सुमारास महाविद्यालयात पोहचले असता, त्या पथकाच्या जवळून ग्रंथपाल फरार झाल्याचे समोर आले. पथकास चेहरा ओळखीचा नसल्यामुळे ताब्यात घेता आले नसल्याचेही स्पष्ट झाले.

अनेक संशोधकांकडून उकळले पैसे
मुख्य आरोपी ग्रंथपाल डॉ. एराज सिद्दीक हिने अनेक पीएच.डी. संशाेधक विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले असल्याची माहिती समोर येत आहे. शिष्यवृत्ती असलेल्या संशोधकाकडून पैसे घेतल्याशिवाय सहीच करीत नसल्याचे एका संशोधकाने फोन करून ‘लोकमत’ला सांगितले. वागण्यासही ग्रंथपाल अतिशय मुजोर असल्याचेही इतर सहकारी प्राध्यापकांनी सांगितले.

अडीच लाख वेतन तरी पैशांची हाव
आरोपी ग्रंथपालास २ लाख ६७ हजार रुपये एवढे वेतन आहे. त्याशिवाय संशोधक विद्यार्थ्यांकडून प्रतिमहिना १० हजार रुपये उकळत होती. तिच्याकडे ८ संशोधक विद्यार्थ्यांचा कोटा असून, बहुतांश विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती असेल, तर गाइडशीप मान्यता देत असल्याचेही विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

कडक कारवाई होईल
घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक आणि गंभीर आहे. विद्यापीठ प्रशासन संबंधित पीएच.डी. मार्गदर्शकाच्या विरोधात नियमानुसार कडक कारवाई करेल.
- डॉ. वाल्मिक सरवदे, प्रकुलगुरू

Web Title: PhD guide have 2.6 lakhs salary, but taking bribe of 10,000 in researchers scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.