पीएच़ डी़,नेट- सेट पात्रताधारकांचे सीएचबीसाठी साकडे
By Admin | Published: July 11, 2017 12:13 AM2017-07-11T00:13:58+5:302017-07-11T00:18:07+5:30
नांदेड: विद्यापीठ तसेच विविध महाविद्यालयांत सहायक प्राध्यापक या पदासाठी पीएच़ डी़, नेट- सेट पात्रताधारकांंना डावलून पदव्युत्तर पदवीधारकांची निवड करण्यात येत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: विद्यापीठ तसेच विविध महाविद्यालयांत सहायक प्राध्यापक या पदासाठी पीएच़ डी़, नेट- सेट पात्रताधारकांंना डावलून पदव्युत्तर पदवीधारकांची निवड करण्यात येत आहे़ संस्थाचालकांची ही मनमानी थांबवून पात्रताधारक असलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र पीएच़ डी़, नेट, सेट प्राध्यापक संघाने केली आहे़
यासंदर्भात स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ पंडित विद्यासागर यांना निवेदन देण्यात आले आहे़ विविध महाविद्यालयांत सध्या सहायक प्राध्यापक पदासाठी मुलाखती घेण्यात येत आहेत़ परंतु मुलाखतीसाठी पात्रताधारकांना डावलून ज्यांना अध्यापनाचे कोणतेही कौशल्य नाही, अशा पदव्युत्तर पदवीधारकांची निवड करण्यात येत आहे़ संस्थाचालकांच्या मर्जीनुसार विभाग प्रमुख तसेच प्राचार्यामार्फत असे प्रकार घडत आहेत़
भविष्यात कायम जागेची संधी निर्माण झाली तर पात्रताधारकांचा नैतिक हक्क होऊ नये, यासाठी उच्चशिक्षितांना डावलले जात असल्याचा आरोप संघाने केला आहे़
पात्रताधारकांना सहायक प्राध्यापक या पदासाठी प्राधान्यक्रमाने प्रथम नियुक्ती द्यावी तसेच ज्यांनी पात्रताधारकांना डावलले आहेत, अशा महाविद्यालयाच्या निवड प्रस्तावाची मान्यता रोखावी, अशी मागणी केली़ निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रा़ डॉ़ आप्पाराव जाधव यांच्यासह ८१ पात्रताधारकांच्या स्वाक्षऱ्या आहेत़