पीएच.डी. प्रक्रिया; होणार उशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:46 AM2017-08-28T00:46:00+5:302017-08-28T00:46:00+5:30
आॅनलाइन पेट घेतल्यानंतर निगेटिव्ह गुणांकनावरून प्रशासनाला माघार घ्यावी लागली असतानाच प्रत्यक्ष संशोधनाला सुरुवात होण्यास विलंब लागणार असल्याचे स्पष्ट झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच. डी. प्रवेशासाठी ‘पेट-४’ परीक्षा घेतल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा तीन महिन्यांत पेट-५ घेण्याची घोषणा कुलगुरूंनी केली होती. आॅनलाइन पेट घेतल्यानंतर निगेटिव्ह गुणांकनावरून प्रशासनाला माघार घ्यावी लागली असतानाच प्रत्यक्ष संशोधनाला सुरुवात होण्यास विलंब लागणार असल्याचे स्पष्ट झाले. पदव्युत्तर, एम.फिल. प्रवेश आणि अभियांत्रिकीच्या कॅरिआॅनमुळे हा उशीर होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विद्यापीठाने पीएच.डी.च्या संशोधनासाठी घोषित केलेल्या पेट-४ परीक्षेला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. तरीही प्रत्यक्ष संशोधनाला सुरुवात झालेली नाही.
सुरुवातीला पेट परीक्षा आॅनलाइन की आॅफलाइन यावरून गोंधळ उडालेला होता. १४ व १५ जुलै रोजी ही परीक्षा आॅनलाइन घेतल्यानंतर पाच दिवसांत निगेटिव्ह गुणांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरल्यामुळे अनेक संघटनांनी तीव्र आंदोलने केली.
या आंदोलनांमुळे प्रशासनाने माघार घेऊन निगेटिव्ह गुणांकन रद्द करून निकाल पुन्हा जाहीर केला. यास महिना उलटला तरी पुढील कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही. एका महिन्याच्या आत सर्व प्रक्रिया करून विद्यार्थ्यांच्या संशोधनाला सुरुवात होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र तो हवेतच विरला आहे. आता पदव्युत्तर प्रवेशाचा गोंधळ ३१ आॅगस्टपर्यंत संपण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर पुढील पाच ते दहा दिवस एम.फिल.ची प्रवेश प्रक्रिया चालेल. त्यानंतर सेट, नेट, एम. फिल., पाच वर्षांचा अनुभव असलेले प्राध्यापक आणि पेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे ‘आरआरसी’साठी नावनोंदणी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया १५ सप्टेंबरनंतर सुरू होणार असल्याचे विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितले.
अनेकांची गाईडशिप जाणार
नवीन नियमानुसार ज्या महाविद्यालयांमध्ये संशोधन केंद्र आणि पदव्युत्तरचा अभ्यासक्रम शिकविण्यात येत नाही, त्या ठिकाणी असलेल्या मार्गदर्शकांची गाईडशिप काढून घेण्यात येणार आहे. तसेच नवीन पात्रताधारकांना गाईडशिप लवकरच देण्यात येणार आहे.