पीएच.डी. ‘व्हायवा’चा बाजार : बहिस्थ परीक्षक म्हणतो, मला काहीच माहिती नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 03:16 PM2020-08-18T15:16:14+5:302020-08-18T15:22:07+5:30
विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातील एका संशोधक विद्यार्थ्याचा पीएच.डी. व्हायवा बहिस्थ परीक्षकाला ४० हजार रुपये दिल्यानंतर घेतला जाईल, असे विद्यार्थ्यास मार्गदर्शकांनीच सांगितले.
- राम शिनगारे
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विषयातील एका संशोधक विद्यार्थ्याचा पीएच.डी. व्हायवा घेण्यासाठी बहिस्थ परीक्षकाने ४० हजार रुपये मागितले असून, ते दिल्यानंतरच व्हायवा होईल, असे पीएच.डी.चे मार्गदर्शक तथा अधिष्ठाता सांगतात. यावर संबंधित बहिस्थ परीक्षकाशी संपर्क साधला असता, त्यांनी मागील वर्षभरात व्हायवासाठी कोणीही संपर्क साधला नसल्याचे सांगितले. तर पीएच.डी. विभागाने त्यांच्याशी तीन वेळा संपर्क साधून तारीख देण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे.
पीएचडीची मौखिक परीक्षा हवी असेल तर ६० हजार मोजा!
विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातील एका संशोधक विद्यार्थ्याचा पीएच.डी. व्हायवा बहिस्थ परीक्षकाला ४० हजार रुपये दिल्यानंतर घेतला जाईल, असे विद्यार्थ्यास मार्गदर्शकांनीच सांगितले. याविषयी ‘लोकमत’ने भंडाफोड केल्यानंतर कुलगुरूंनी मार्गदर्शक तथा अधिष्ठातांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला. पीएच.डी. व्हायवासाठी बहिस्थ परीक्षक म्हणून परभणी येथील एका महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. सुनील शिंदे यांना बोलावण्यात आले होते. या गैरप्रकाराविषयी डॉ. शिंदे यांच्याशी विद्यापीठातून एका प्राध्यापक संघटनेच्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित विद्यार्थ्यांचा शोधप्रबंध मूल्यांकन अहवाल वर्षभरापूर्वीच पाठविला. त्यानंतर आपल्याशी मार्गदर्शक किंवा विद्यापीठ प्रशासनाने एकदाही संपर्क साधला नसल्याचे सांगितले. त्यामुळे मार्गदर्शक संशोधक विद्यार्थ्यास बहिस्थ परीक्षकाला देण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी करीत असल्याचे आॅडिओतून स्पष्ट होत आहे. तर बहिस्थ परीक्षक संपर्कच साधला नसल्याचे सांगत आहे.
पैसे मिळाले नसल्यामुळे संशोधक विद्यार्थ्याचा तीन वेळा व्हायवा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. https://t.co/pFzvYZmGF6
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 17, 2020
पीएच.डी. विभागातून माहिती घेतली असता, त्या बहिस्थ परीक्षकाने तीन वेळा व्हायवासाठी तारीख देऊन गैरहजर राहिल्यामुळे व्हायवा झाला नाही. तसेच आगामी तारीख देण्यासाठी एक वेळा पत्रव्यवहार केला असून, तीन वेळा भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. मात्र, संबंधिताने आपण मार्गदर्शकाशी बोलून तारीख ठरवितो, असे सांगितल्याची सूत्रांनी माहिती दिली. यामुळे बहिस्थ परीक्षक खोटे बोलतो की मार्गदर्शक त्याचा उलगडा होऊ शकला नाही.
‘लोकमत’चे वृत्त सोशल मीडियात व्हायरल
‘पीएच.डी.च्या व्हायवासाठी मोजा ६० हजार’ या मथळ्याने ‘लोकमत’मध्ये प्रकाशित वृत्त सोशल मीडियात तुफान व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. व्हॉटस्अॅपच्या विविध ग्रुपमध्ये या वृत्तावर चर्चा करण्यात येत होती. फेसबुकरवही अनेकांनी उच्चशिक्षणात शिरलेल्या या प्रवृत्तीचा निषेध नोंदवत कारवाई करण्याची मागणी केली आहे.