धम्माचे तत्त्वज्ञान आजही तेवढेच प्रेरक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:05 AM2021-06-01T04:05:26+5:302021-06-01T04:05:26+5:30
औरंगाबाद : सर्वत्र रुढी, अंधश्रद्धा व धर्मांधतेने कळस गाठलेल्या काळात तथागत भगवान गौतम बुद्धांनी बुद्धीप्रामाण्यावाद हा केंद्रबिंदू असलेला ‘बौद्ध ...
औरंगाबाद : सर्वत्र रुढी, अंधश्रद्धा व धर्मांधतेने कळस गाठलेल्या काळात तथागत भगवान गौतम बुद्धांनी बुद्धीप्रामाण्यावाद हा केंद्रबिंदू असलेला ‘बौद्ध धम्म’ स्थापन केला. वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित शांतता व मानवमुक्तीचे या धम्माचे तत्त्वज्ञान आजही तेवढेच प्रेरक आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रदीप आगलावे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने भगवान बुद्ध अध्यासनाच्या वतीने सोमवारी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, केंद्राचे संचालक डॉ. संजय मून यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या (नागपूर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे माजी प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांचे ‘भगवान बुद्धांचे समाज परिवर्तनाचे विज्ञान’ या विषयावर ते म्हणाले, जो धम्म समता आणि मानवतेवर आधारित आहे. ज्या धम्मात ईश्वराला स्थान नाही. जो धम्म विज्ञाननिष्ठ आणि शांतीच्या मार्गाचा आहे, अशा धम्माचे संस्थापक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती जगभर साजरी झाली. वर्तमानात मागच्या जन्माचा काडीमात्र संबंध नाही. माणसाची स्थिती आनुवंशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते, हे बुद्धांचे तत्त्वज्ञान आहे. बुद्धांनी जगातील शास्त्रज्ञ व विद्वानांना प्रभावित केले आहे. बुद्धांचा धम्म स्वीकारून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रुढी परंपरांच्या जोखडातून समाजबांधवांना मुक्त केले.
बुद्ध हे पहिले शास्त्रज्ञ
मानवाच्या प्रत्येक दु:खाला मानवच कारणीभूत असून, मानवाच्या मनाचे शास्त्रीय विवेचन करणारे भगवान गौतम बुद्ध हे जगातील पहिले शास्त्रज्ञ होत. मानव एका 'मॅड रेस’मध्ये सामील झाला असून, भगवान बुद्धांनी सांगितलेली सत्ये आजही प्रासंगिक आहेत, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षीय समारोपात म्हणाले.