‘फिजिक्स’ने विद्यार्थ्यांची, तर पावसाने घेतली पालकांची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:03 AM2021-09-13T04:03:02+5:302021-09-13T04:03:02+5:30
--- औरंगाबाद : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नीट (यूजी) परीक्षा रविवारी शहरातील ४३ केंद्रांवर पार पडली. १५ हजार ...
---
औरंगाबाद : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नीट (यूजी) परीक्षा रविवारी शहरातील ४३ केंद्रांवर पार पडली. १५ हजार ८५० विद्यार्थांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ हजार ४५० विद्यार्थ्यांनी रविवारी प्रत्यक्ष ही परीक्षा दिली. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण ९७.०५ टक्के एवढे होते, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेचे शहर समन्वयक रविंदर राणा यांनी सांगितले.
रविवारी दुपारी २ ते ५ वाजे दरम्यान असलेल्या परीक्षेसाठी सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना केंद्रांत प्रवेश देण्यात आले. त्यामुळे ३ तासांच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना केंद्रांवर पाच तासांपेक्षा अधिक काळ काढावा लागला. पाल्यांना परीक्षा केंद्रांवर सोडविण्यासाठी आलेल्या पालकांना महाविद्यालयांनी प्रवेशद्वाराबाहेरच रोखले.
परीक्षेसाठी बुलडाणा, बीड, जालना, परभणीसह विविध जिल्ह्यांतून शहरात आलेल्या पालकांनी महाविद्यालय परिसरात सकाळपासूनच हजेरी लावली होती. अकरा वाजेनंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देताना त्यांना मास्क, सॅनिटाझर, हॅण्डग्लोजचे वाटप करण्यात आले. ओळखपत्र, फोटोची पडताळणी करुन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. पालकांना महाविद्यालयांच्या गेटबाहेरच उभे केले होते. त्यामुळे दिवसभर झालेल्या पावसाने पालकांची जणू परीक्षाच घेतली, अशी प्रतिक्रिया पालकांतून उमटल्या.
---
परीक्षार्थी म्हणाले
आजचा पेपर मध्यम काठीण्य पातळीचा होता. नवीन नियमाप्रमाणे २० प्रश्न या वर्षी जास्त होते. त्याचा फायदा निकालावेळी कळेल. कोरोनाचे नियम पाळून झालेल्या परीक्षेने एकदाचे मनावरचे दडपण दूर झाले.
- अथर्व सोमवंशी, कन्नड येथील परीक्षार्थी
----
बायोलाॅजी विषयाचे प्रश्न अवघड गेले नाहीत. केमिस्ट्रीचे प्रश्न खूप सोपे होते. मात्र, फिजिक्सचे न्यूमरिकल प्रश्न खूपच टफ होते. निगेटिव्ह मार्किंग असल्याने जे प्रश्न आले तेवढेच सोडवले. परीक्षा झाली एकदाची. आता फक्त निकाल लवकर लागावा.
- मुकुंद जमदडे, सिंदखेड राजा येथील परीक्षार्थी
---
वेळच पुरला नाही
या वेळी २० प्रश्न वाढवलेले होते. त्यात फिजिक्सचे न्यूमरिकल आणि थेअरीचे प्रश्न खूप अवघड असल्याने वेळच पुरला नाही. फिजिक्सचे प्रश्न फाॅर्म्युला बेस नव्हते.
- ऋतुजा भंवर, बीडकीन येथील परीक्षार्थी
----
परीक्षेपूर्वी केंद्रात बसून राहावे लागले
जालन्याहून औरंगाबाद गाठून सकाळी ११.४० ला परीक्षा केंद्रात गेले. २ वाजता पेपर सुरु झाला. तोपर्यंत बसून होते. इतर सुविधा केंद्रावर होत्या. २०० प्रश्नांपैकी फिजिक्स विषयाचे प्रश्न अवघड होते. इतर विषयांचे प्रश्न सोपे वाटले.
- वृषाली वाघमारे, जालना येथील परीक्षार्थी
(सर्व प्रतिक्रियांचे फोटो सोडले आहेत)