फिजिओथेरपीमुळे विकलांगांना नवसंजीवनी
By Admin | Published: February 14, 2016 11:51 PM2016-02-14T23:51:57+5:302016-02-15T00:19:30+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड येथील जिल्हा रुग्णालयात फिजिओथेरपी कक्षाद्वारे मोफत भौतिकोपचार (फिजिओथेरपी) उपचार मिळत असल्याने गोरगरीब कुटुंबातील विकलांग रुग्णांना नवसंजीवनी मिळत आहे
व्यंकटेश वैष्णव , बीड
येथील जिल्हा रुग्णालयात फिजिओथेरपी कक्षाद्वारे मोफत भौतिकोपचार (फिजिओथेरपी) उपचार मिळत असल्याने गोरगरीब कुटुंबातील विकलांग रुग्णांना नवसंजीवनी मिळत आहे. यामध्ये १२ वर्षांखालील मुलांनाही सेवा मिळत असल्याने जन्मत:च विकलांग असलेली मुले चालू लागली आहेत.
‘सेरेब्रल पाल्सी’ या आजाराचा परिणाम जाणवत आहे. आठ महिन्यांपूर्वी जिल्हा रुग्णालयात सहा वर्षांचा फैजान नावाचा विकलांग मुलगा जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. मेंदूत क्यूचा साठा कमी पडल्याने फैजानला अपंगत्व आले होते. त्याचे दोन्ही पाय निकामी झाले होते. हा रुग्ण फिजिओथेरपीसाठी जिल्हा रुग्णालयात आठ महिन्यांपूर्वी दाखल झाला होता. अथक परिश्रम व उपचाराच्या बळावर शनिवारी हा मुलगा आपल्या पायावर चालण्यास सक्षम झाला. जन्मल्यानंतर पहिल्यांदाच फैजान चालत असल्याचे पाहून त्याच्या कुटुंबियांना आनंदाचे भरते आले.
जिल्हा रुग्णालयातील डॉ. चव्हाण यांनी आठ महिने फैजानला दिलेल्या उपचार पद्धतीमुळे विकलांग फैजानला चालणे शक्य झाले. जिल्हा रुग्णालयात व्यवसाय उपचार व भौतिक उपचार विभाग उभारल्याने ग्रामीण भागातल्या गोरगरीब रुग्णांना मोफत फिजिओथेरपी सेवा मिळत आहे. खाजगी रुग्णालयात फिजिओथेरपीचा उपचार घ्यायचा म्हटले तर एक ते सव्वालाख रुपये मोजावे लागत होते. शिवाय उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागत असे. मात्र, जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या पुढाकाराने फिजिओथेरपी विभाग सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
जिल्हा रुग्णालयात फिजिओथेरपी विभाग सक्षम चालविण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, ओ.पी.डी. इन्चार्ज संगीता शिरसाट व कक्षसेवक आशा भासरकर यांचे मोेठे योगदान असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.