‘ब्रेक फेल’ होऊन पिकअप उलटली; सात भाविक जखमी
By Admin | Published: May 2, 2017 11:34 PM2017-05-02T23:34:51+5:302017-05-02T23:38:18+5:30
परंडा : कर्जत तालुक्यातील गुरूपिंपरी येथून येरमाळा येथील येडाई देवीच्या दर्शनाला निघालेल्या पिकअप वाहनाचा ब्रेक फेल होऊन ती उलटल्याने सातजण जखमी झाले.
परंडा : कर्जत तालुक्यातील गुरूपिंपरी येथून येरमाळा येथील येडाई देवीच्या दर्शनाला निघालेल्या पिकअप वाहनाचा ब्रेक फेल होऊन ती उलटल्याने सातजण जखमी झाले. ही घटना परंडा-सोनारी रस्त्यावरील विद्युत उपकेंद्राजवळ सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील गुरुपिंपरी येथील गंगावणे कुटूंबीय मिरजगाव येथे पाहुण्यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम करून पिकअपमधून (क्र. एमएच ०५/ बीएच ३९२६) परंडा मार्गे येरमाळा येथील येडाई देवीच्या दर्शनासाठी जात होते. सोनारी-परंडा रोडवरील २२० केव्ही उपकेंद्राजवळ आल्यानंतर वाहनाचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे हे वाहन रस्त्याच्या खाली जाऊन उलटले. यामध्ये औसाबाई भागवत गंगावणे (वय ७०), रुपेश वसंत वाघमारे (वय ३२), आशाबाई गंगावणे (वय ४०), पप्पु गंगावणे (वय ५०), नंदाबाई गंगावणे (वय ४०), बंडू साळुंके वय (४०) व ड्रायव्हर गणेश गंगावणे (वय ४०) हे जखमी झाले. जखमींवर परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.(वार्ताहर)